”पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर…”, निलेश राणेंचा हल्लाबोल

निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

  मुंबई : पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. अजित पवार यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील यांना लक्ष्य केले होते. यावरुन निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला.

  निलेश राणे यांनी ट्विट करुन अजित पवार यांना खडेबोल सुनावले. अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून फाटल्यानंतर पडद्यामागून अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण पाठिंब्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे हे सरकार ४ दिवसांत गडगडलं. पण तो निर्णय चुकीचाच होता, असं फडणवीस म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं”, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक काळातील आघाडीविषयी फडणवीसांनी यावेळी सविस्तर भूमिका मांडली आहे.

  मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका दुटप्पी – पवार

  मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजप नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार यांनी म्हटले. राज्य सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

  ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा..

  दरम्यान, अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी मान्य केलं. “तो निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केलं. पण ही चूक होती. आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. आमच्या समर्थकांमध्ये जी माझी प्रतिमा होती, त्याला देखील काही प्रमाणात तडा गेला. ते नसतं केलं तर चांगलं झालं असतं”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.