प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई (Mumbai).  कुलाबा येथील नौदल तळावर सुटीवरून कामावर परतलेल्या एका 24 वर्षीय नौसैनिकाने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रमेश चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुळचा जोधपूर येथील रहिवासी आहे. सदर मृतकाच्या मृत्यूचे कारण अद्यापही गुपित आहे. मात्र मागील 1वर्षांत कुलाबा नौदल तळावरील ही तिसरी आत्महत्येची घटना आहे.

रमेश अविवाहित असून सुट्टीवरून कामावर परतला होता. त्याच्या घरी आई-वडिल, लहान बहीण असा परिवार आहे. मुंबई कुलाबा येथे ‘आयएनएस बेतवा’ वर तो तैनात होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडली. जहाजावर त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि त्याच्याशेजारी रायफल ठेवलेली होती. त्यावरुन त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज लावण्यात आला. सुट्टीवर घरी गेल्यावर जमिनीच्या वादांमुळे ते तणावात असल्याचे अहवालात समोर आले होते. मागच्या वर्षात झालेल्या दोन आत्महत्येच्या घटनांमध्ये कुलाबा नौदल तळावरील दोघे सैनिक सुट्टीवरूनच परतले होते व तिघेही पंचवीशीच्या आतील होते. त्यामुळे याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंदुस्थानच्या भूदलात आत्महत्येची प्रकरणे समोर येतात पण नौसेनेत अशी प्रकरण फार कमी दिसून आली आहेत. जवानांना अनेकदा मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्या तणावातून आत्महत्या केल्याचे समोर येते. याआधी गेल्यावर्षी 2020 जानेवारी मध्ये एका नाविकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आयएनएस शिवालिक वर तैनात असलेल्या 24 वर्षीय नाविकाने स्वत:च्या पिस्तुलाने गोळी मारली होती.