ऑपरेशन क्लीनला संयुक्त किसान मोर्चाचे ऑपरेशन शक्तीने प्रत्त्युत्तर,  १० मे रोजी विशेष राष्ट्रीय परिषद : डॉ. अशोक ढवळे

    मुंबई : कोरोना परिस्थितीचा फायदा उपटत भाजप सरकार २६ एप्रिलला पाच महिने पूर्ण करणारे ऐतिहासिक किसान आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. विविध राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागण्याची वाट पहात आहे. ते येताच केंद्र सरकार आणि हरियाणाचे राज्य सरकार ‘ऑपरेशन क्लीन’ या नावाने किसान आंदोलनावर थेट हल्ला करून त्यांना दिल्लीच्या सर्व सीमांवरून हुसकावून लावण्याचा कट रचत आहेत. असा आरोप किसान मोर्चाचे डॉ. अशोक ढवळे यानी प्रसिध्दी पत्राव्दारे केला आहे.

    १० मे  रोजी विशेष राष्ट्रीय परिषद

    कोरोना महामारीच्या नावावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याच्या या कारस्थानाला जबरदस्त प्रत्त्युत्तर देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने दुहेरी रणनीती आखली आहे. शेतकऱ्यांवर जर ‘ऑपरेशन क्लीन’ चालवले गेले तर त्याला शेतकरी कडाडून विरोध करतील, असा स्पष्ट इशारा ढवळे यानी सरकारला दिला आहे. त्यासाठी २० ते २६ एप्रिल हा आठवडा ‘प्रतिकार सप्ताह’ म्हणून पाळला जाणार असून सर्व सीमांवर कोरोनापासून आंदोलनकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी जोरदार व्यवस्था करण्यात आली आहे.  किसान आंदोलन अधिक मजबूत व्हावे याकरता १० मे २०२१ रोजी एक विशेष राष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. याकरता देशभरातून विविध शेतकरी संघटनांचे नेते व प्रतिनिधी तसेच कामगार, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी या सर्व घटकांच्या आणि प्रगतिशील, लोकशाही विचारांच्या संघटना यादेखील सहभागी होणार आहेत.

    बोट दाखवण्यास जागाच नाही

    केंद्र सरकारने तीन कृषी अध्यादेश आणताच जून २०२० मध्ये या आंदोलनाची सुरुवात झाली आणि पुढे २६ नोव्हेंबर २०२० रोजी ते दिल्लीच्या सीमांवर धडकले त्याच्या पूर्वीपासूनच देशभरात कोरोनाची लागण व्हायला सुरुवात झाली होती. गेले पाच महिने देशभर सगळीकडे कोरोना फैलावत असताना दिल्लीलगतच्या आंदोलनस्थळांवर त्याचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. आणि हे मत केवळ आंदोलकांचेच नाही तर अनेक स्वतंत्र निरीक्षकांनी ते व्यक्त केले आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाकडे बोट दाखवण्यास खरे तर सरकारला जागाच उरलेली नाही असे कॉम्रेड ढवळे यानी म्हटले आहे.