डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी वरळीत ड्रोनने सॅनिटायझेशन!; अडगळीच्या ठिकाणी होणार वापर

पावसाळा सुरु झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी पालिका अडगळीची ठिकाणी शोधून तिथे किटकनाशक फवारणी, निर्जंतुकीकरण आणि डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम करते. या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशक निर्जंतुकीकरण उपक्रम राबवला जातो आहे.

  मुंबई : डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहिम राबवली जाते. वरळी येथे ‘सॅनिटायझेशन’ करणारा अत्याधुनिक ड्रोन पालिकेच्या वरळी विभागात दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी पोहचता येणे कठीण असेल अशा वसाहती व अडगळीच्या ठिकाणी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. हा ड्रोन चालवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

  मुंबईतील रेल्वे यार्ड, बंद गिरण्या तसेच दाटीवाटीच्या झोपडपट्यांत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पोहचण्यासाठी कठीण जाते, अशा ठिकाणी डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना रोखण्यासाठी ‘सॅनिटायझेशन’ करणारा अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध करण्यात आला आहे. ‘फाइट द बाईट’ या प्रकल्पाचा आज प्रारंभ करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

  पावसाळा सुरु झाला की साथीचे आजार डोके वर काढतात. डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी पालिका अडगळीची ठिकाणी शोधून तिथे किटकनाशक फवारणी, निर्जंतुकीकरण आणि डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याचे काम करते. या पार्श्वभूमीवर ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशक निर्जंतुकीकरण उपक्रम राबवला जातो आहे. हा उपक्रम ‘सीएसआर’च्या माध्यमातून राबवला जातो आहे. या उपक्रमाद्वारे ड्रोनच्या माध्यमातून मॅपिंग-सर्वेक्षणाचे कामही परिणामकारकरित्या करता येणार असल्याचे सांगण्यात आले.

  असा आहे ड्रोन

  हा ड्रोन १० लीटर क्षमतेचा असून त्यावर रिमोट कंट्रोलने नियंत्रण ठेवता येणार आहे. कॅमेरा आणि स्वयंचलित यंत्रणेमुळे उंच ठिकाणी डासांच्या ब्रिडिंगचे स्पॉट, साठलेल्या पाण्याची माहिती फोटोसह मिळणार आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  Sanitation by drone in Worli Mumbai to prevent dengue malaria Use in difficult places