
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सायंकाळी पत्रकार परिषद, राठोडांच्या राजीनाम्यावर भाष्य करणार ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पाठवू नका, अशा प्रकारची गळ संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे पत्रकार परिषदेत राठोडांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पूजा चव्हाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा : चित्रा वाघ
संजय राठो़ड यांनी राजीनामा दिला आहे, याची सरकारकडून अद्याप घोषणा झालेली नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही. गेले १५ दिवस गायब होते. पूजा चव्हाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आहे. असे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई व्हावी : नवाब मलिक
ज्या पद्धतीने पूजा चव्हाण या प्रकरणी वेगवेगळी चर्चा सुरु होती. माहितीनुसार संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, याचा योग्य ती चौकशी व्हावी. जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होईल, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे : संजय राठोड
संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडलेले काही महत्त्वाचे मुद्दे :
- मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे.
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
- विरोधकांनी घाणेरडं राजकारण केल.
- बंजारा समाज, माझी बदनामी केली.
- मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला.
- ३० वर्षांच्या कामावर आक्षेप
- या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि तपासातून सत्य बाहेर यावं. त्यानंतर कारवाई करणं अपेक्षित होतं.
- विरोधकांनी अधिवेशन रोखण्याची भूमिका घेतली, त्यातून माझी आणि बंजारा समाजाची प्रतीमा मलीन
- मंत्रिपदापासून दूर राहून चौकशीला सहकार्य करणार
पहिल्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता : देवेंद्र फडणवीस
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता, पुरावे भयानक आहेत. अशा स्थितीत मंत्रिपदावर राहायला नको होतं. वरिष्ठांचा पाठिंबा असल्याचा आवीर्भाव होता. उपाय उरला नाही, म्हणून राजीनामा..,एफआयआर दाखल करायला हवा. तसेच त्यांना वाचवायचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करा; आशिष शेलार यांची मागणी
संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. दरम्यान, राजीनामा दिला म्हणून चालणार नाही, याप्रकरणी पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करण्यात चालढकल का केली? असा सवाल शेलार यांनी केला आहे.
राजीनामा घेतल्याबद्दल स्वागत, उशिरा सुचलेलं शहाणपण : प्रविण दरेकर
माजी वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत, पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे कारण समोर आलं पाहिजे, ठाकरे बाणा उशिरा दाखवून का त्यांनी राजीनामा घेतला. हे पहिल्याच दिवशी झालं असतं, तर आणखी चांगलं झालं असतं. असे प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
मागील अर्ध्या तासापासून वर्षा बंगल्यावर वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये मी राजीनामा देतो पण चौकशीनंतर राजीनामा मंजूर करा, अशा प्रकारची विनवणी वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.मंत्रिपद वाचवण्यासाठी संजय राठोडांचे अखेरपर्यंत प्रयत्न सुरू आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा प्रस्ताव मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडकलेले वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. दरम्यान, संजय राठोड प्रकरणावर तीन’पाट’ सरकार असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.