विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा ; सामनातून भाजप नेत्यांवर हल्लाबोल

एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत.

  मुंबई : एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने करण्यात आली. या आक्रोशात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुतेही सहभागी झाले होते. तसंच अनेक भाजप नेत्यांनी सरकारच्या निर्णयाचा विरोध करताना ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?, अशा शब्दात भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.

  विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय ?

  एका बाजूला कोरोना वाढतोय म्हणून सरकारला दोष द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली तर सरकारचे पाय ओढायचे, असे आपल्या विरोधी पक्षाचे चालले आहे. एमपीएससी परीक्षेबाबतही त्यांचे धोरण दुटप्पीच आहे. आगीत तेल ओतण्याचे हे धंदे त्यांनी आता बंद करावेत. पेट्रोल , डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत , पण विरोधी पक्षासाठी ते स्वस्त झाले आहेत काय ? विरोधी पक्षहो , आगीत ओतण्यासाठी तुम्हाला कोणी स्वस्त भावात तेलपुरवठा करीत आहे काय ?

  राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने

  राज्य लोकसेवा आयोगाची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा आता २१ मार्चला होईल. सरकारने तातडीने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी आनंदी झाले असले तरी याप्रश्नी राजकारण करू पाहणाऱ्यांची थोबाडे आंबट झाली आहेत. ‘एमपीएससी’ परीक्षा १४ मार्चला होणार होती. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा तूर्तास पुढे ढकलल्याचे जाहीर होताच पुण्यातील रस्त्यांवर स्पर्धा परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. राज्याच्या इतर भागांतही तुरळक आंदोलने झाली. या आंदोलनात तेल ओतण्याचा प्रयत्न राज्यातील विरोधी पक्षनेते करीत होते, पण तेलात भेसळ असल्याने आंदोलन पेटण्याआधीच विझले.

  परीक्षेची नवी तारीख जाहीर

  सरकारने आता लगेच परीक्षेची नवी तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकले आहे. ग्रामीण भागात परीक्षा रद्द होणे म्हणजे किती अडचणींना तोंड द्यावे लागते हे त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाच माहीत. या परीक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण कोरोनाचा वाढता संसर्ग असेच आहे. मदत व पुनर्वसन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगास कोरोनाच्या स्थितीबाबत पत्र पाठवले. त्यावर आयोगाने सचिव स्तरावर निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उद्रेक झाला तेव्हा ‘आयोग’ आणि सचिव मंडळ पळून गेले व आग विझवायला मंत्र्यांनाच यावे लागले.