Sanjay Raut is worried about Raj Thackeray'

मनसेने आक्रमकपणा न दाखवल्यामुळे शिवसनेचे संजय राऊत यांनी मनसेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल संजय राऊतांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि शिवसेना (Shivsena)  यांच्यातील शाब्दिक युद्ध पेटले आहे. कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली त्यामुळे शिवसैनिकांनी तिच्यावर टीका केली होती. या वादात मात्र मनसे बॅकफूटवर होती. मनसेने आक्रमकपणा न दाखवल्यामुळे शिवसनेचे संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी मनसेबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भविष्याबद्दल संजय राऊतांनी चिंता व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामना यामध्ये भाजपवर टीका केले आहे. तर राज ठाकरे यांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “ठाकरे” हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा “ब्रॅण्ड” नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हे सुद्धा त्याच ब्रॅण्डचे एक घटक आहेत. त्यामुळे या सगळ्याचा फटका त्यानाही बसणार आहे. त्यांचे शिवसेनेसोबत मतभेद असू शकतात, परंतु शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्डचे पतन होण्यास सुरुवात होईल त्या दिवसापासून मुंबईचेही पतन होण्यास सुरुवात होईल अशी चिंता संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

तसेच मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे दुर्भाग्य आहे. पण सुशांत आणि कंगनाला पाठिंबा देऊन त्यांच्या बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारमधील उच्वर्णीय राजपूत, क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरु आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यासाठी माहाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्यांना शोभणार नाही असा खोचक टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.