सोनियांच्या जागी शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष बनवा – संजय राऊतांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या नेतृत्वाबाबत व्यक्त केली शंका

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी(soniya gandhi) यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे(rashtrawadi congress) अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांना युपीएच्या अध्यक्षपदी बसवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

  मुंबई: काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी(soniya gandhi) यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएच्या अध्यक्षपदी बसवा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएचे पुनर्गठन व्हावे, असे त्यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

  अनेक पक्ष युपीएमध्ये का नाहीत ?

  राऊतांनी युपीएच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. युपीएचे नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावे ज्यांना विरोधक स्वीकारतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केले आहे की, युपीएचे पुनर्गठन केले पाहिजे. संजय राऊत विचारण्यात आले की, तुम्ही युपीएचे घटक नाहीत. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आता आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएतून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही एनडीएतून बाहेर पडलाय. ममता बॅनर्जीही एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे एनडीए किंवा युपीएचे घटक नाहीत. ते युपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे, असे राऊत म्हणाले.

  विरोधकांमध्ये पवार यांच्या नावावर सहमती असेल

  राऊत पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष मजबूत व्हायचे असेल तर युपीएला मजबूत करायला हवे आणि युपीएला मजबूत करायचे असेल तर त्याचे नेतृत्व अशा व्यक्तीच्या हाती द्यावे जो अ‍ॅक्टिव्ह असेल आणि विरोधकांमध्ये त्यांच्या नावावर सहमती असेल. तेव्हा संजय राऊतांना असे कुठले व्यक्तीमत्व आहे ज्याच्या नावावर सहमती होईल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राऊत यांनी आता तरी फक्त शरद पवार यांचेच नाव समोर येते. काँग्रेस नेत्यांनी ते स्वीकारायला हवे. शरद पवार यांना युपीएचा अध्यक्ष बनवल्यावर युपीए अधिक मजबूत होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

  कमावले नाही ते विकून खायचे हा भाजपचा धर्म

  पंतप्रधान मोदी व त्यांचे सहकारी राष्ट्राचा विचार करत असतील तर ते राष्ट्रीय संपत्तीचा बोजवारा उडवणार नाहीत. ही सर्व संपत्ती गेल्या सत्तरेक वर्षांत मोठ्या कष्टातून उभी राहिली आणि त्यात भाजप किंवा मोदी सरकारचे योगदान नाही. जे आपण कमावले नाही ते विकून खायचे हा कोणता धर्म?, असा सवाल करत, ज्यांनी हे सर्व तुमच्यासाठी कमवून ठेवले त्यांना रोज लाथा घालायच्या हेच सध्या सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

  संसद भवनाची मालकी तरी भारताकडे ठेवा

  स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव पुढच्या काळात साजरा होईल त्यावेळी ७५ वर्षांच्या काळात निर्माण केलेल्या राष्ट्रीय संपत्तीचा लिलाव झालेला असेल. मग नवे काय उभे राहिले, तर एक हजार कोटी रुपये खर्च करून निर्माण होणारे नवे संसद भवन. संसद भवनाची मालकी तरी भविष्यात स्वतंत्र हिंदुस्थानच्या लोकांकडे राहू द्या इतकेच. अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.