कोरोना काळात निवडणुका आणि CBI, ED चा खेळ खेळत बसले; संजय राऊत यांचा पंतप्रधान मोंदींवर रोखठोक निशाणा

देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरण आणि पश्चिम बंगालमधील सीबीआयची कारवाई या मुद्द्यांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कटाक्ष टाकला आहे. देशातील लस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी देशाच्या नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच, राष्ट्रवाद गंगेत मुडद्यांच्या रुपात तरंगताना पाहिला यावर जे बोलतील ते आता राष्ट्रद्रोही ठरतील, अशी खरमरीत टीकाही केली. शिवसेनेच्या मुखपत्रातील सदरातून राऊत यांनी भाजपाच्या राष्ट्रवादावर ताशेरे ओढत हल्लाबोल केला आहे.

  मुंबई : देशातील कोरोनाची स्थिती, लसीकरण आणि पश्चिम बंगालमधील सीबीआयची कारवाई या मुद्द्यांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कटाक्ष टाकला आहे. देशातील लस तुटवड्याचा मुद्दा उपस्थित करत राऊत यांनी देशाच्या नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवालही उपस्थित केला आहे. तसेच, राष्ट्रवाद गंगेत मुडद्यांच्या रुपात तरंगताना पाहिला यावर जे बोलतील ते आता राष्ट्रद्रोही ठरतील, अशी खरमरीत टीकाही केली. शिवसेनेच्या मुखपत्रातील सदरातून राऊत यांनी भाजपाच्या राष्ट्रवादावर ताशेरे ओढत हल्लाबोल केला आहे.

  संपूर्ण जग कोरोनाशी लढण्यासाठी रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका मास्कमुक्त झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळवला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही कोरोना काळात निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ खेळत बसलो, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींना लक्ष्य केले आहे.

  पश्चिम बंगालमधील कारवाई राजकीय सूडबुद्धीने

  पश्चिम बंगालमध्ये सीबीआयचे लोक घुसले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी नसताना दोन मंत्री आणि दोन आमदारांना अटक केली. या नारदा स्टिंग प्रकरणात भाजपचे सध्याचे प्रमुख नेते हातभर फसले आहेत. त्या लाचखोरीत सुवेन्दू अधिकारी या पलटीरामाचे नाव आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. अधिकारी यांनी पाच लाख रुपये स्वीकारल्याचे चित्रफितीत दिसते. पण हे अधिकारी ममता बॅनर्जींना सोडून आल्यामुळे त्यांना अटक झाली नाही आणि यावर राज्यपाल धनकड मौन बाळगून असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. ज्या नारदा प्रकरणात तृणमूलच्या मंत्री व आमदारांना अटक केली त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले. मग सीबीआयने त्यांना अटक करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित करत याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे प्रकरण राजकीय सूडबुद्धीनेच केले जात आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे.

  चंद्रकांत पाटलांवर साधला निशाणा

  कोरोनाचे संकट कायम असताना महाराष्ट्रावर चक्रीवादळाने हल्ला केला. अशा वेळी राजकारण थोडे बाजूला ठेवून देशासाठी व राज्यासाठी काम करणे गरजेचे आहे. पण महाराष्ट्रातील भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपला 400 जागा मिळतील. यावर आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचे बघू. लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत, असेही राऊत म्हणाले.

  देशाचा भेसूर चेहरा जगासमोर

  भाजपाच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोरोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेतत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच आहे असे सांगतानाच, म्हणून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.