varsha gaikwad

राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करणार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा (Corona Virus) प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसत असले तरी, शाळा (School) सुरू करण्याचा विचार दिवाळीनंतरच करण्यात येईल, असे महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad)  यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षेला राज्य सरकारचे प्राधान्य असून सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे योग्य नसल्याचेही त्या म्हणाल्या.

राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा विचार करणार आहे. नववी ते बारावीचे विद्यार्थी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत विचार केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टप्प्याटप्प्याने शुल्काची मुभा

कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा पालकांना टप्प्याटप्प्यात शुल्क भरण्याची मुभाही देण्यात आली आहे. विद्यार्थी शुल्क भरू शकला नाही तरी, शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. एखाद्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.

अकरावी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास वेळ लागत आहे. त्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.