परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी नोटीस नंतर दुसरा धक्का : बदली घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांकडून चौकशी सुरू

परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या नंतर आता बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याने परब यांच्या सांगण्यावरून लाखो रूपयांचा घोटाळा करत विभागात केलेल्या बदल्यांबाबत राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

    मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आलेली असतानाच परब यांना दुसरा धक्का बसला आहे. परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने धाडी मारल्या नंतर आता बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याने परब यांच्या सांगण्यावरून लाखो रूपयांचा घोटाळा करत विभागात केलेल्या बदल्यांबाबत राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भात उद्या सुनावणी होणार असून या सुनावणीला जबाब नोंदविण्यासाठी तक्रारदार डॉ किरिट सोमैय्या यांना  लोकायुक्तांकडून हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

    परब आणि बजरंग खरमाटे यांच्या संगनमताने करोडोचा घोटाळा

    नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप परिवहन अधिकारी असलेले खरमाटे हे परब यांचे वाझे असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. ते परिवहन मंत्री अनिल परब यांचे जवळचे मानले जातात. अनिल परब आणि बजरंग खरमाटे यांनी संगनमताने करोडो रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप भाजप नेते किरिट सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि २५-३० लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.