अकरावी प्रवेशाची दुसरी यादी जाहीर; मराठा विद्यार्थी खुल्या गटात सामावून पात्रता गुणांत वाढ

मुंबई : जवळपास तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अकरावीची दुसरी प्रवेश यादी जाहीर झाली आहे. या यादीत मराठा प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण लागू न करता या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्यात आले आहे. मुंबई महानगर परिसरात दुसऱ्या फेरीत पात्रता गुण पहिल्या फेरीच्या तुलनेत पाच गुणांनी वाढले आहेत.

दुसऱ्या फेरीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे. अर्ज केलेले ७९ हजार ५७९ अद्यापही विद्यार्थी अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर मराठा आरक्षणावर अंतरिम स्थगिती आल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मराठा प्रवर्गासाठी आरक्षित जागांवर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी झाली.

या फेरीत १ लाख ५५ हजार ८१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ७६ हजार २३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही या फेरीत घटली आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीच्या दुसऱ्या यादीतील प्रवेश पात्रता (कट ऑफ) गुणांमध्ये पहिल्या फेरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. साधारण पाच गुणांनी (एक टक्का) या फेरीचे पात्रता गुण वाढले आहेत. विशेषत: वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठीची चुरस वाढली आहे. मराठा प्रवर्गासाठी राखीव जागा खुल्या गटात समाविष्ट करण्यात आल्या. मात्र बहुतेक नामांकित महाविद्यालयांमधील जागा पहिल्या फेरीतच भरल्या होत्या. दुसऱ्या फेरीसाठी एखाद दुसरीच जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे पहिल्या फेरीप्रमाणेच बहुतेक महाविद्यालयांचे पात्रता गुण आहेत, तर काही महाविद्यालयांचे गुण वाढले आहेत.