ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांचा वाद पक्षश्रेष्ठींच्या दरबारात, डॉ. नितीन राऊत-बाळासाहेब थोरात यांची दिल्लीवारी

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच मंत्रीपदाची पक्षश्रेष्ठीना मागणी केली होती त्यावेळी त्यांना ऊर्जा विभाग मिळणे अपेक्षीत होते मात्र नितीन राऊत नाराज झाल्याने त्यांनी पटोले यांच्या विरोधात गा-हाणे पक्षश्रेष्ठी समोर मांडण्यासाठी दिल्ली गाठल्याचे सांगण्यात येत आहे. 

  मुंबई: प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्यात मंत्रीपदावरून असलेला वाद दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या दरबारात पोहोचला आहे. पटोलें यांच्याशी मतभेद असल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्ली गाठल्याचे सांगण्यात येत आहे.

  राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष

  नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच मंत्रीपदाची पक्षश्रेष्ठीना मागणी केली होती त्यावेळी त्यांना ऊर्जा विभाग मिळणे अपेक्षीत होते मात्र नितीन राऊत नाराज झाल्याने त्यांनी पटोले यांच्या विरोधात गा-हाणे पक्षश्रेष्ठी समोर मांडण्यासाठी दिल्ली गाठल्याचे सांगण्यात येत आहे.

  दरम्यान नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून खनिकर्म महामंडळाबाबत नियमबाह्य निविदा प्रक्रिया झाल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण राऊत यांच्या ऊर्जा खात्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राऊत-पटोले यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे

  दिल्ली भेटीमुळे सर्वाचे लक्ष वेधले

  दरम्यान कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत दिल्लीत दाखल झाले आहेत.  ते पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार करणार असल्याची माहिती जाणकार सूत्रांनी दिली आहे.

  याबाबत थोरात यांनी यापूर्वी पक्षाचे प्रभारी एच के पाटील यांच्याशी चर्चा केल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे. नितीन राऊत आणि थोरात यांच्या एकत्र दिल्ली भेटीमुळे सर्वाचे लक्ष वेधले गेले आहे.

  विधानसभा अध्यक्षपदाचा दावा सोडणार?

  नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेत आहेत. या भेटीत विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे राखण्याबाबत चर्चा अपेक्षीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पदावरील कॉंग्रेसचा दावा सोडून शिवसेनेकडील वनमंत्रीपद आणि आणखी एक उपमुख्यमंत्रीपद कॉंग्रेसला देण्यात यावे अशी चर्चा असल्याने त्याबाबतही या भेटीत पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.