ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार यांचे निधन

जयंत पवार यांनी रचलेल्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहासाठी २०१२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

  मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, नाटककार जयंत पवार (Jayant Pawar) यांचे शनिवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे (Sandhya Nare) व मुलगी असा परिवार आहे. मराठी भाषेतील एक विचारी, साक्षेपी आणि संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे नाट्य क्षेत्रासह सगळीकडेच शोककळा पसरली आहे.

  जयंत पवार यांनी रचलेल्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहासाठी २०१२ साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

  अधांतर हे नाटक खूप गाजले होते. २०१४ सालच्या जानेवारी महिन्यात १० ते १२ या तारखांना महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते. त्यांनी ‘लालबाग परळ झाली मुंबई सोन्याची’ या मराठी चित्रपटाचे कथालेखनही केले होते.

  जयंत पवार यांनी लिहिलेली नाटकं

  – अधांतर
  – काय डेंजर वारा सुटलाय
  – टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)
  – दरवेशी (एकांकिका)
  – पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)
  – फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
  – बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भा़ाषाविषयक)
  – माझे घर
  – वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)
  – वंश
  – शेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक)
  – होड्या (एकांकिका)