Separation in the Mahavikas front? Shiv Sena, NCP and Congress angry over Urmila's name

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरमुळे महाविकास आघाडीत जुदाई येण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या १२ नावांवर तिन्ही पक्षांतून नाराजीचा सूर असतानाच शिवसेनेत उर्मिलाच्या नावावरुन वाद सुरु आहे. 

मुंबई:  बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरमुळे (urmila matondkar) महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) जुदाई येण्याची चिन्ह आहेत. विधान परिषदेच्या १२ नावांवर तिन्ही पक्षांतून नाराजीचा सूर असतानाच शिवसेनेत उर्मिलाच्या नावावरुन वाद सुरु आहे.

विधान परिषदेत १२ जागांवर नामनिर्देशित करण्यासाठी आमदारांच्या नावांची यादी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. मात्र, यादीत असलेल्या नेत्यांच्या नावांवरुन आता शिवसेना(shivsena),  राष्ट्रवादी(NCP) आणि काँग्रेसमध्ये (congress) नाराजीचा सूर उमटत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव राज्यपालांकडे पाठविण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. कला क्षेत्रातून आमदारकी देण्यासाठी पक्षात अनेक चेहरे होते.  मात्र, त्यांचा विचार करण्यात आला नाही असे नाराज नेत्यांचे म्हणणे आहे. मराठी अभिनेते आदेश बांदेकर(adesh bandekar), शरद पोंक्षे(sharad ponkshe),  सुबोध भावे (subodh bhave) यांच्यासह शिल्पा नवलकर(shilpa navalkar) या अभिनेत्यांना डावलून मुख्यमंत्र्यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेची ऑफर दिली. कला क्षेत्रातील नाराजीसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या समर्थकांमध्येही नाराजी पसरली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांचा विधानसभेचा मार्ग सोपा करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मात्र त्याचे फळ त्यांना मिळाले नसल्याचे या यादीवरुन दिसून येते.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे देखील या शर्यतीत होते. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांचा पत्ता कट करण्यात आला. सत्यजीत हे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत तांबे यांची आमदारकी निश्चित मानली जात होती. मात्र, घराणेशाहीच्या आरोपांपासून बचाव करण्यासाठी शेवटच्या क्षणी बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांचे नाव मागे घेतल्याचे सुत्रांनी म्हंटले.

सत्यजीत तांबेंनी उघड नाराजी व्यक्त केली नसली तरी ‘श्रद्धी आणि सबुरी’ असे ट्विट करुन नाराजीच्या चर्चेला तोंड फोडले आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविणाऱ्या अनिरुद्ध वानकर यांना काँग्रेसने आमदारकी दिल्याने पक्षात नाराजीचा सूर आहे.

विधान परिषदेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, सगळ्यांनाच संधी देणे अवघड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

सरकारकडून १२ जणांची यादी राज्यपालांकडे सोपविण्यात आली आहे, राज्यपालांनी १५ दिवसांत याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

आमदारकी न मिळाल्याने राष्ट्रवादीतही अनेक नेते नाराज आहेत. जुन्या निष्ठावंतांना पक्षाने अडगळीत टाकले असल्याची भावना या नेत्यांमध्ये आहे. नुकतेच पक्षात आलेल्या एकनाथ खडसे,  आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना संधी मिळाल्याने पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत.