गंभीर आरोपांची चौकशी गरजेची; लाच प्रकरणी पुण्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला

पुणे जिल्ह्यातील स्वप्नील शेवकर नामक दूध विक्रेत्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, ४ जानेवारी २०२१ रोजी एक महिला शेवकर यांच्या घरी येऊन त्यांच्या भावाला भेटली. स्वप्नील यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे त्यांच्यावर काही गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, असे सांगून संपर्क साधता यावा म्हणून तिने तिचा मोबाइल नंबर दिला.

  • उच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

मुंबई : अटक पूर्व जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयाची पायरी चढलेल्या पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यांच्यावरील आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून त्याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे, असे म्हणत न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला.

पुणे जिल्ह्यातील स्वप्नील शेवकर नामक दूध विक्रेत्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, ४ जानेवारी २०२१ रोजी एक महिला शेवकर यांच्या घरी येऊन त्यांच्या भावाला भेटली. स्वप्नील यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे त्यांच्यावर काही गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, असे सांगून संपर्क साधता यावा म्हणून तिने तिचा मोबाइल नंबर दिला.

स्वप्नील यांनी तिच्याशी संपर्क साधला आणि नंतर तिची भेट घेतली असता आपण न्यायदंडाधिकारी जतकर यांची सहकारी असल्याचे सांगत महिलेने आपले नावं शुभवरी गायकवाड असे सांगितले. तसेच जर त्याने पाच लाख रुपये देण्याचे कबूल केले तर मी हे प्रकरण मिटवू शकतो असेही सांगितले. मात्र, पुढे वाटाघाटीनंतर तिने ही रक्कम तीन लाख रुपयांपर्यंत कमी केली.

त्याविरोधात शेवकर यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल केली. १४ जानेवारी २०२१ रोजी शेवकर सदर महिलेला भेटले. तिने शेवकर यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गायकवाडला अटक केली. तेव्हा, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जटकर यांच्या वतीने आपण लाच स्वीकारत असल्याचा तिने चौकशी दरम्यान सांगितले.

अटक होऊ नये म्हणून जतकर यांनी पुणे सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. म्हणून जतकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यावर नुकतीच न्या. सारंग कोतवाल यांच्या समोर सुनावणी पार पडली. तेव्हा, आपले पती हे मुंबईत नोकरीला असून मी ११ महिन्यांच्या बाळासह पुण्यात एकटीच राहत आहे. पाळणाघर शोधत असताना आपण गायकवाडच्या संपर्कात आलो. मात्र, तिच्या अशा हालचालींची आपल्याला माहिती नव्हती, असा दावा जतकर यांनी न्यायालयात केला.

मात्र, जतकर आणि गायकवाड यांच्यात १४७ फोन कॉल्सची देवाणघेवाण झाल्याचे तपासात आढळून आले असून या संभाषणांमुळे अर्जदाराचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे दोन्ही आरोपींमधील नेमके काय संबंध आहेत. तसेच अन्य कोणत्या प्रकरणात या दोघांनी असेच कृत्य केले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अर्जदारांची चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार अतिशय जबाबदार पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरणाचा सविस्तर तपास करणे गरजेचे असल्याचेही नमूद करत न्या. कोतवाल यांनी जतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.