शरद पवारांनी घेतली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची हजेरी; मंत्री आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार

कोरोनाची तिस-या लाटेचा संभाव्य धोका कमी झाला आहे, तसेच सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे दुकाने व हॉटेलच्या वेळा पूर्ववत कराव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(nawab malik) यांनी दिली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी (ता.१२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

  मुंबई : कोरोनाची तिस-या लाटेचा संभाव्य धोका कमी झाला आहे, तसेच सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे दुकाने व हॉटेलच्या वेळा पूर्ववत कराव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(nawab malik) यांनी दिली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी (ता.१२) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

  युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला

  नवाब मलिक म्हणाले की, टाळेबंदीत व्यापाऱ्यांनी मोठे नुकसान सहन केले आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. आणखी त्यांचे नुकसान होऊ नये. कोरोनाचा धोका टळला आहे.  व्यापाऱ्यांना आता दिलासा दिला पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळा वाढवण्याची विनंती करण्यात येणार आहे. सहा जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालावर बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रवादीची कामगिरी उत्तम झाली. जागा वाढल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्याचे अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिले जाणार आहेत. मात्र त्याचा निर्णय मुंबईत पक्ष नेतृत्व घेईल.

  भरपाईबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा

  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर आहेत. त्याच्या तयारीसाठी सर्व ३६ जिल्ह्यात शिबीरे, मेळाव्या घेण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ दसऱ्यानंतर केला जाईल. त्याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे मलिक म्हणाले. ईडी, सीबीआय, आयटी यांचे छापे टाकून आमच्या पक्षाच्या नेत्यांना केंद्राकडून त्रास दिला जात आहे. त्याला समर्थपणे तोंड देण्याचा निर्णय बैठकीत झाला. राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अधिकच्या भरपाईबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

  मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नातून बाहेर यावे

  भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नातून बाहेर यावे. विरोधी पक्षनेते म्हणुन जनतेची सेवा करावी. विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मोठे पद आहे, असा टोला मलिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना लगावला. दरम्यान पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या दुपारी माध्यमांशी संवाद साधणार  आहेत  अशी माहिती मलिक यानी दिली.