Balasaheb-Thorat

मुंबई : राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर शरद पवार यांनी एका मुलाखतीत भाष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. त्यावरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आता शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचे नेतृत्व पक्षाने स्विकारले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करत आहेत. शरद पवार यांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असे मला वाटते, असे बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रातले सरकार टीकवायचे असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणे टाळा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता थोरात यांनी हे वक्तव्य केले आहे.

पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करणार आहेत, असा विश्वासही थोरात यांनी यावेळी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असेही थोरात म्हणाले.