sharad pawar

केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. वाझेंचे शिवसेनेसोबत जवळचे संबंध असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना पवारांची मदत घ्यावी लागली आहे.

  मुंबई : अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला वाचविण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहे. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या 45 मिनिटांच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये सचिन वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येऊ नये, याबाबत मंथन झाल्याचे समजते.

  केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएने या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. वाझेंचे शिवसेनेसोबत जवळचे संबंध असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी उद्धव ठाकरेंना पवारांची मदत घ्यावी लागली आहे.

  सततच्या वादांमुळे पवार नाराज

  गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडी सरकार कोणत्या ना कोणत्या वादांमध्ये अडकत असल्यामुळे पवार नाराज आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील कथित अत्याचाराच्या आरोपांपासून या वादांची सुरुवात झाली होती. हा वाद पवारांनी आपल्या कुटनितीने निकाली काढला. मात्र, या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच शिवसेना कोट्यातील मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आले. यामुळे पुन्हा एकदा सरकारची कोंडी झाली. या प्रकरणी पवारांच्या दबावामुळेच राठोड यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजीनामा द्यावा लागला होता, असे बोलले जात आहे. हे वाद पूर्णत: संपलेले नसतानाच महाविकास आघाडी सरकार वाझेंच्या अटकेमुळे पुन्हा कोंडीत सापडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सततच्या वादांमुळे शरद पवार सरकारच्या कामकाजावर नाराज आहेत. विरोधी पक्षाला सरकारची कोंडी करण्यासाठी आयते कोलीत मिळू नये, अशी पवारांची इच्छा आहे.

  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा घेतला क्लास

  याच पार्श्वभूमीवर पवारांनी राकाँ मंत्र्यांचा सोमवारी क्लास घेतला. राकाँच्या सर्व मंत्र्यांची बैठक मुंबईतील नरीमन पॉइंटस्थित यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पवारांनी राकाँ मंत्र्यांना वादापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते. अँटेलिया स्फोटक प्रकरण सरकारने ज्याप्रमाणे हाताळले, त्यावर पवार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी वाझेंवर सोपविल्यामुळे पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  नेत्यांसह पोलिस अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेदेखील वर्षावर दाखल झाले. वाझे प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि अनिल परब या प्रमुख मंत्र्यांनी जावून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ही बैठक संपत नाही तोच मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. त्याआधी गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबेनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अनिल परब यांनाही भेटले. म्हणजे एकीकडे राजकीय भेटीगाठी होत असतानाच दुसऱ्या बाजुला मुंबई पोलिस दलातील अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धावल्याचे चित्र दिवसभर होते.