ट्रॅजेडी किंगच्या आठवणीत रमले शरद पवार; ‘ दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी गेले होतो सायकलवरून

आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती.

  मुंबई:  अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची वार्ता ऐकल्यानंतर आपल्या मित्राच्या निधनाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही व्यथित झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देतानाच दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहण्याचा जेजुरीतील किस्साही सांगितला. पवार म्हणाले की, देशाने एक महानायक गमावला आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. जेजुरीत शुटिंग सुरू होते. त्यावेळी आम्ही तरुण होतो. दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागल्यावर आम्ही थेट सायकलवरून जेजुरी गाठली. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहिले. नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचे वेगळे नाते निर्माण झाले. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, असेही पवार यांनी सांगितले.

  दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलेवर, त्यांच्यावर अस्था असलेल्या घटकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असेल. पण त्यांना जे काही आयुष्य मिळाले त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्याबद्दल आपण कृतज्ञ राहणे हेच योग्य होईल - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

  संरक्षण यंत्रणांना नेहमीच सहकार्य
  पवार म्हणाले की, मुंबईच्या सार्वजनिक जीवनात त्यांचा सहभाग असे. राजकारणातही त्यांचा सहभाग होता. म्हणून सरकारने त्यांना मुंबईचे शेरीफ केले होते. त्यावेळी त्यांनी शेरीफ म्हणून त्यांनी चांगले काम केले होते, असेही त्यांनी सांगितले. भारत चीन युद्ध, भारत-पाक युद्धा नंतर जवानांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, जनमाणसात एकसंघत्व निर्माण करण्यासाठी दिलीप कुमार यांनी संरक्षण यंत्रणांना नेहमीच सहकार्य केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  भारताबाहेरही लोकप्रियता
  परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असे ते म्हणाले. अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना मी भेटून आलो होतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली होती, असेही त्यांनी सांगितले.