शरद पवार उमेदवारांशी चर्चा करणार; आज होणार महत्वाची बैठक

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार, खासदार व वजनदार नेत्यांनी पक्ष सोडला होता. पुन्हा सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे या सर्व नेत्यांची भाजपच्या तंबूत आसरा घेतला होता. जिल्ह्याजिल्ह्यातले तालेवार नेते ऐनवेळी सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व शरद पवारांनाही धक्का बसला होता. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची अवस्था दयनीय झाली होती. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार मिळवणे कठीण झाले होते.

    मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे एकाकी पडलेल्या, तरीही अनपेक्षितरित्या ‘कमबॅक’ करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच सावध होत पुढील तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीने विद्यमान आमदारांसोबतच मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्वत: या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

    ‘ती’ परिस्थिती पुन्हा ओढावू नये म्हणून…

    2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार, खासदार व वजनदार नेत्यांनी पक्ष सोडला होता. पुन्हा सत्ता येणार नाही हे लक्षात आल्यामुळे या सर्व नेत्यांची भाजपच्या तंबूत आसरा घेतला होता. जिल्ह्याजिल्ह्यातले तालेवार नेते ऐनवेळी सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला व शरद पवारांनाही धक्का बसला होता. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाची अवस्था दयनीय झाली होती. अनेक ठिकाणी चांगले उमेदवार मिळवणे कठीण झाले होते.

    अशा परिस्थितीत शरद पवारांनी जिद्दीने प्रचाराचा किल्ला लढवत वातावरण फिरवले व पक्षाची घसरण थांबवली. निकालानंतर ‘किंगमेकर’ची भूमिका बजावत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन केले व भाजपला सत्तेबाहेर फेकले. मागील वेळी ओढवलेली परिस्थिती भविष्यात ओढवू नये म्हणून राष्ट्रवादी आतापासूनच कामाला लागली आहे. त्यासाठीच पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

    महापालिका निवडणुकांवरही लक्ष

    बुधवार, 8 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील वर्षी मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड येथील सत्ता ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. तर, नाशिकसह अन्य महापालिकांमध्ये पक्षाला स्वत:चा प्रभाव वाढवायचा आहे. आजी-माजी आमदारांची बैठक त्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत शरद पवार नेमके काय मार्गदर्शन करतात, याबद्दल उत्सुकता आहे.