हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा; अजित पवारांकडून शरद पवारांचे अभिष्टचिंतन

मुंबई : हिमालयाच्या उंचीच्या ‘सह्याद्री’ ला हार्दिक शुभेच्छा अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरणीय खासदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन केले. शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

१२ डिसेंबर हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. तो क्षण आज आपण एकत्र घालवला याचा आनंद होतोय. राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. हे काम आपल्याला पुढे न्यायचे आहे. राज्यावर संकट आल्यानंतर आपण धावून गेले पाहिजे अशी शरद पवारांची शिकवण असल्याचे ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

मागच्या ५० वर्षांपासून आपण पवारांना सामाजिक जीवनात काम करताना पाहतोय. ८० व्या वर्षीही ते त्याच ताकदीने काम करत आहेत. मला तर वाटतं, पवारसाहेबांसारखा नेता या शतकात तरी होणार नाही. पवारसाहेबांसारखे नेते आपल्याकडे आहेत, याचा मला अभिमान आहे. असे म्हणत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.