सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया…

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

मुंबई :  सुशांतसिंग राजपूत हत्या प्रकरणात काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व स्तरातून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली जात होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, अशी मला आशा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.   

दाभोलकर हत्या प्रकरणावरून पवारांचा सीबीआयवर निशाणा –

२०१४ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती. मात्र अद्यापही योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणाची परिणती होणार नाही. अशा प्रकारचा अप्रत्यक्षरित्या टोला शरद पवारांनी सीबीआयवर लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंग राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज पुण्यस्मरण दिन आहे. या निमित्तानं शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांच अभिवादन केलं आहे.  अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अज्ञानाधारित शोषणाविरूद्ध कडवी झुंज देणारे विज्ञाननिष्ठ विचारवंत, आपल्या साहित्याच्या माध्यमातून गैरसमजुती, धार्मिक रूढी आणि परंपरांवर आसूड ओढणारे बुद्धीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन.