‘ती’ १२ नावांची यादी सुरक्षित; राजभवनाकडून अखेर खुलासा…

मिळालेल्या माहितीनुसार ती १२ नावांची यादी सुरक्षित आहे आणि आता त्यावर राजपाल कधी निर्णय देतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

    मुंबई : राज्यपालनियुक्त 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली 12 आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता 12 आमदारांची यादी राजभवनात सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी काल राज्यपालांना टोला लगावला होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही 24 तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, अशी टिप्पणी राऊत यांनी केली होती. तसेच, राजभवनात भुतं आली का? अशी टीकाही त्यांनी केली होती.

    राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेवर करण्यावरून सरकार विरुद्ध राजभवन यांच्यात बराच वाद आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनवर जावून १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली होती. तेव्हापासून राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, अद्याप या यादीबाबत निर्णय का घेतला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने २१ मे रोजी केली होती.

    तसेचं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही १२ जणांची यादी राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. मात्र, अशी यादी उपलब्ध नसल्याचे उत्तर सचिवालयाने दिले. त्याचा आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रात ‘१२ नावांची यादी भुतांनी पळविली का’, असा खोचक प्रश्न करत त्याबाबतचे उत्तर आता राज्यपालांनीच द्यावे, असे म्हटले होते. त्यामुळे आता मिळालेल्या माहितीनुसार ती १२ नावांची यादी सुरक्षित आहे आणि आता त्यावर राजपाल कधी निर्णय देतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.