शिवसेनेमुळे माझे केस उडाले; चंद्रकांत पाटील यांची टीका

    मुंबई : भाजपा पाच वर्षे शिवसेनेसोबत सरकारमध्ये होती. सरकारमध्ये सोबत असतानाही शिवसेना रोज भांडायची. शिवसेना खासदार संजय राऊत रोज जाकिट सावरत यायचे. आपण सरकारमध्ये आहोत हेही त्यांना कळायचे नाही. रोज आम्हाला शिव्याशाप दिले जायचे. रोज बाहेर पडण्याची, राजीनाम्याची भाषा केली जायची. माझ्याकडे तेव्हा आठ खाती होती. त्यांच्यासोबत सरकार चालवल्यामुळे माझ्या डोक्यावरचे केस उडाले, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.

    भाजपच्या ओबीसी मोर्चाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत सरकार चालवण्याचा अनुभव किती भयंकर होता हे आपल्या खास शैलीत सांगितले. ओबीसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. एकतर अनेक विषयांमधले ह्यांना काही कळत नाही. खोडा घालायचा एवढेच कळते. त्यामुळे आपल्याला आपल्या ताकदीवर एकहाती सरकार आणायचेच आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या दिशेने आपण सगळे धावूया, असे पाटील म्हणाले.

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना पंतप्रधान करा, असे म्हटले होते. पृथ्वीबाबांचे ते वक्तव्य स्तुतीपर होते की…?, असा खोचक सवाल करतानाच असे विधान करून त्यांनी मुख्यमंत्र्यांची हेटाळणीच केली, असा टोला पाटील यांनी लगावला. पाटील यांनी यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनाही आव्हान दिले. भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे सरकारमधील दोन मंत्री लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपाच्या मनात खोट नाही. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणावर कोल्हापूरच्या बिंदू चौकात येऊन फडणवीस यांच्याशी चर्चा करावी. म्हणजे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असे पाटील म्हणाले.

    ओबीसी आरक्षणासाठी जागर अभियान आपल्याला करायचेच आहे. फेब्रुवारीची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय करायची, असा महाविकास आघाडी सरकारचा प्लान आहे. एकदा का निवडणूक झाली की पाच वर्षे काहीही होऊ शकणार नाही हे त्यांना चांगले माहीत आहे. पण त्यांचा हा प्लान यशस्वी होऊ द्यायचा नाही, असे आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केले. हे सरकार किती दिवस आहे माहीत नाही. रोज सकाळी पडले, पडले असे वाटते, पण संध्याकाळी पुन्हा उभे राहते.

    - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजपा