प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. त्याची कारणे काय, बेस्टला कायम स्वरूपी अनुदान कसे मिळेल, बेस्टच्या मालकीच्या जागांचे नियोजन कसे करावे याबाबत श्वेतपत्रिका काढण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्ष आग्रही आहे.

बेस्ट समितीचे सदस्य आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्टच्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पावरील भाषणात बेस्टवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

बेस्टने विविध बँकांकडून कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करण्यासाठी बेस्टला पालिकेने २५०० कोटी रुपये अनुदान दिले आहे. त्यापोटी बेस्टच्या व्याजाचे वर्षापोटी ७०० कोटी वाचले आहेत.

पालिकेने दिलेल्या निधीतून किती पैसे वाचले, किती खर्च झाले याचा कृती आराखडा याबाबत माहिती देण्याची सूचना जाधव यांनी केली. कृती आराखड्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असेही त्यांनी म्हटले आहे.

लॉकडावुनच्या काळात बस गाड्यांचे प्रवर्तन कमी झाले. त्याचा आर्थिक फटका बेस्टला बसला. प्रवाशी संख्या आणि एकूण उत्पन्न यावर कोरोनाचा काळात मोठा परिणाम झाला. त्यामुळे उत्पन्न आणि प्रवाशी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.