शिवसेनेचा निष्ठावान अनंतात विलीन होऊन तारा झाला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनंत तरे यांना श्रद्धांजली

ठाण्याचे महापौर पद असो, एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष पद असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी असो की, ठाण्यातील संघटनेचे कोणतेही काम असो; अनंत तरे नेहमी पुढे, शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्त्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला.

    मुंबई :  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. शोकसंदेशात त्यानी म्हटले आहे की, ” ठाण्याचे शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक अनंत तरे गेले, कोविड योद्धा अखेर कोविडने आपल्यातून हिरावून नेला, अनंत तरे म्हणजे ठाण्यातला सच्चा कार्यकर्ता. शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी द्यायची आणि अनंत तरे यानी ती निभावायची आणि त्यांना सर्व कोळी समाजातील बांधवांनी, शिवसैनिकानी साथ द्यायची हे जणू ठरलेले समीकरणच.

    ठाण्याचे महापौर पद असो, एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष पद असो, लोकसभा निवडणुकीत मिळालेली उमेदवारी असो की, ठाण्यातील संघटनेचे कोणतेही काम असो; अनंत तरे नेहमी पुढे, शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्त्ता आज अनंतात विलीन झाला आणि खरेच तारा म्हणून आकाशगंगेत सामावला. अनंता आता तुला कोण पाहू शकणार नाही पण तुझी स्मृती कायम आम्हा शिवसैनिकांच्या स्मरणात राहील.

    एक तारा निखळला

    मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त करताना पुढे म्हटले आहे की, खरंच अनंत तरे यांच्या निधनाने शिवसेना कुटुंबातील एक तारा निखळला, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ” अशा दुःखद भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.