Shiv Sena Minister Gulabrao Patil's reaction to Yogi Adityanath's announcement of Film City

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात नव्या फिल्मसिटीच्या उभारणीची घोषणा केल्यानंतर त्यांनी आज मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी बॉलिवुडमधल्या कलाकारांना उत्तर प्रदेशला येण्याचं आवाहन केले आहे. यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. यूपीत जाऊन कलाकारांनी काय डाकू बनायचंय का? असा सवाल उपस्थित करत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी योगींना जबरदस्त टोला लगावला आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना मुंबई फिल्मसिटीच कलाकारांसाठी कशी योग्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी प्रकरणांचा हवाला देत सुरक्षेचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. ‘बॉलिवुडमधले कलाकार उत्तर प्रदेशमध्ये कशाला जातील. उत्तर प्रदेशमध्ये जाऊन त्यांना काय डाकू बनायचं आहे का? असा टोला त्यांनी लगावला आहे.

कलाकारांना इथे जे स्वातंत्र्य आहे, सुरक्षित वातावरण आहे तो उत्तर प्रदेशात मिळेल का? मुंबई कोणतीही महिला सुरक्षित फिरू शकते. इथे काम करण्याची सुरक्षितता आहे. उत्तर प्रदेशमध्ये कशाला कुणी जाईल? उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या लोकांनी बँका लुटल्या आहेत, लुटमार केली आहे त्यांची नुसती नावं जरी बॉलिवुडमधल्या लोकांनी वाचली, तरी तिथे जाण्याचा विचार रद्द करून टाकतील’, असंही पाटील म्हणाले.