रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोडला बाण

शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी शाब्दिक चिमटे काढले. दरम्यान, दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवार आपण हल्ला केला पाहीजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

मुंबई : केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी शेतकरी आंदोलनामागे (farmers protest) चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य केलं होत, त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना शाब्दिक चिमटे काढले. दरम्यान, दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवार आपण हल्ला केला पाहीजे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

दानवेंच्या विधानाची दखल घेत संजय राऊतांनी सोडला बाण

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. यावर केंद्रीय मंत्रिमंडळातही चर्चा झाली असेल. त्यामुळे लडाखमधील चिनी सैन्याच्या घुसखोरीकडे तुर्तास दुर्लक्ष करा. पण सिंघू बॉर्डरपर्यंत आतमध्ये शिरलेल्या चीनला सर्वप्रथम रोखले पाहिजे. दानवेंचे वक्तव्य प्रमाण मानून आपण भारतात अराजक आणि अशांती माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनवर आपण हल्ला केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.