‘भोकं पडलेला फुगा नारोबा राणे’ सामनातून राणेंवर टीका

पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुध्द शिवसेना हा मंगळवारपासून सुरु असलेला हाय होल्टेज अजूनही संपलेला नाही. काल राणेंना रत्नागिरीतून अटक झाल्यानंतर महाड न्यायालयाने रात्री जामीन मंजूर केला. मात्र, या सर्व प्रकरणावर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज पुन्हा राणेंवर टीका करण्यात आली आहे.

    ‘नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिडय़ा जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई.’ अशी उपकाराची भाषा सामनाच्या संपादकीयमधे वापरण्यात आली आहे.

    काय म्हटलय आजच्या सामनात?

    ‘पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या ‘महात्मा’ नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत.’

    ‘मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारने तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय?’ असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.