रुग्णालयातील कचऱ्यावर क्लिन-अप मार्शलचा डोळा, पैसे उकळण्याच्या धंदयाबाबत शिवसेनेचा स्थायी समितीत आरोप

मुंबईत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपल्या कार्यक्षेत्रात मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि दवाखाने अहोरात्र काम करीत आहेत. या ठिकाणी निर्माण होणार्‍या बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट पालिकेच्या माध्यमातून लावण्यात येते.

मुंबई :  मुंबईत (Mumbai) विविध रुग्णालयांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर क्लिन- अप मार्शलचा डोळा असून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेने (Shiv Sena) स्थायी समितीत केला. प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर रुग्णालयात जमा होणाऱ्या पीपीई किटसह (PPE Kit) इतर बायोमेडिकल कचर्‍याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईत नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपल्या कार्यक्षेत्रात मुख्य रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये आणि दवाखाने अहोरात्र काम करीत आहेत. या ठिकाणी निर्माण होणार्‍या बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट पालिकेच्या माध्यमातून लावण्यात येते.

बायोमेडिकल कचर्‍यामध्ये रक्त नमुन्याच्या बाटल्या, सिरिंज, ऑपरेशन थिएटरमध्ये कापलेले मानवी शरीराचे भाग अशा विविध प्रकारच्या कचर्‍याचा समावेश होतो. मात्र साथीचे आजार आणि विविध गंभीर आजारांमध्ये बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट लागेपर्यंत खबरदारी घेण्यात येत असली तरी या कचर्‍याच्या संपर्कात येणारे कर्मचार्‍यांना धोका असतो. त्यामुळे संबंधित कचऱ्यावर निर्जंतुकीकरण करुन रुग्णालयातच विल्हेवाट लावावी. खासगी कंत्राटदारांना तसे निर्देश द्यावेत, अशी सूचना राष्ट्रवादी च्या गटनेत्या राखी जाधव यांनी मांडली. जाधव यांच्या सुचनेला शिवसेनेच्या नगर सेविका राजूल पटेल यांनी पाठिंबा दिला.

मुंबईतील खासगी रुग्णालये, दवाखाने आणि नर्सिंग होममध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा होता. रुग्णालय परिसरात आढळून येणाऱ्या अशा कचऱ्यावर क्लिन- मार्शलची नजर पडल्यास दंडात्मक कारवाईसाठी धमकावले जाते. वाटाघाटी करुन पैसे उकाळले जातात, असा गंभीर आरोप पटेल यांनी केला. मुंबईतील इमारती, सोसायट्यांना शंभर किलोपर्यंत कचऱ्यावर विल्हेवाट लावण्याचे आदेश आहेत. त्यात धर्तीवर खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, दवाखान्यांना कचऱ्याचे विघटन करण्याची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी केली. तसेच नगरसेवक निधीतून नागरिकांना उघडझाप होणारे डबे उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना पटेल यांनी केली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला लेखी उत्तर देण्याचे निर्देश देत प्रस्ताव मंजूर केला. बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट गरजेचे केंद्र सरकारच्या बायोमेडिकल वेस्ट (व्यवस्थापन व हाताळणी) नियम १९९८ संदर्भात २८/४/२०१६च्या अधिसुचनेनुसार बायोमेडिकल कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापूर्वी हा कचरा निर्माण होणार्‍या ठिकाणी निर्जंतुक करणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर एकंदरीत सर्व रुग्णालयांमध्ये निर्माण होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्या ठिकाणी सर्वात आधी अत्याधुनिक पद्धतीने निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे, असा प्रशासनाचा दावा आहे.