शिवसेनेचा विधानसभा अध्यक्षपदावर डोळा तर काँग्रेसला पाहिजे उपमुख्यमंत्री पद

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्यामुळे सर्वत्र जाधवांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यातच विधानसभा अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेत होत आहे. तर जाधव यांनी याला दुजोरा देत अध्यक्षपद स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसच माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून चांगले काम केले असले तरी काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

    मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्यामुळे सर्वत्र जाधवांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यातच विधानसभा अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेत होत आहे. तर जाधव यांनी याला दुजोरा देत अध्यक्षपद स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसच माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून चांगले काम केले असले तरी काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव असल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

    शिवसेनेचा डोळा

    शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी, विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेनेकडे असलेले मंत्रिपद कायम राहिले आणि तिन्ही पक्षांनी मला अध्यक्षपदाची संधी दिली तर मी विधानसभा अध्यक्षपदाला साजेसे काम करेन. कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही, असे वागेन. विधानसभा अध्यक्षपद घेताना मंत्रिपद शिवसेनेने देऊ नये ही माझी भूमिका आहे. मला पक्ष जी भूमिका देईल ती मी सांभाळेन. विधानसभा अध्यक्षपदी बसल्यावर सरकार आणि पक्षीय भूमिका घेता येणार नाही. सभागृहात समतोल साधण्याचा प्रयत्न करेन, असे जाधव म्हणाले. जाधवांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेनेचा डोळा असल्याचे अधोरेखित होत आहे.

    वनमंत्री खाते काँग्रेसला मिळणार !

    राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करतेवेळी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने किमान-समान कार्यक्रमावर भर दिला होता. त्यानुसार, शिवसेनेचा मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री तर, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले होते. सध्याच्या घडीला राज्यातील विधानसभा अध्यक्ष आणि वनमंत्री पद रिक्त आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या दोन्ही पदाची अदलाबदली केली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वनखाते काँग्रेसला देऊन विधानसभा अध्यक्षद शिवसेनेकडे सोपविले जाईल, असे बोलले जात आहे.

    …तर राज्यात दोन उपमुख्यमंत्री !

    काँग्रेस आणि शिवसेनेत देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी थेट दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद सोडून उपमुख्यमंत्रिपदाबाबत रस दाखवल्याचे कळते. त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद असा एक फॉर्म्युला दोन्ही पक्षाच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास, राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

    भास्कर जाधव यांनी विधिमंडळात चांगली कांमगिरी केली. याबद्दल त्यांचे कौतुकच आहे. मात्र, सरकार तीन पक्षाचे असून सर्वसहमतीनेच विधासभा अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला जाईल. विधानसभा अध्यक्षपद यापूर्वी काँग्रेसकडेच होते आणि आताही ते काँग्रेसकडेच राहील. कुणी काहीही दावे केले तरी, त्याला गांभीर्याने घेवू नये.

    - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री