शिवसेनेची गुजराती होर्डिंग; मनसेची घणाघाती टीका

मुंबई : शिवसेनेने नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी मराठी भाषिकांसह गुजराती भाषेत होर्डिंग प्रदर्शित केल्याने मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी आता जोमात सुरू झाली असून पक्षाचे सदस्य व नवीन मतदार नोंदणीलाही सुरुवात झाली आहे.

मराठी ही राज्याची राज्यभाषा असताना व सत्ताधारी सेनेच्या नगरसेविकानी घाटकोपर विभागात चक्क मराठी सह गुजराती भाषे मध्ये होर्डिंग लावल्याने मनसेने सेनेला पुन्हा वाभाडे ओढण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना प्रभाग क्रमांक १२८ च्या नगरसेविका अश्विनी दिपक हांडे,  माजी नगरसेवक दिपक हांडे यांचे फोटो व शिवसेना नाव असलेले होर्डिंग विभागात लावण्यात आले आहेत. शिवसेनेने सदस्य नोंदणी अभियान विभागात सुरू केले असून गुजराती भाषिकांना आपल्याकडे ओढण्यासाठी चक्क गुजराती भाषे मध्ये होर्डिंग लावल्याचा टोला मनसेकडून लगावला आहे.

सत्ताधारी शिवसेनेचा मराठी बाणा संपला का ? कुठे गेले सेनेचे मराठी प्रेम ? असा सवाल मनसेकडून सेनेला करण्यात आला आहे.

आम्हीच मराठीचे कैवारी असे म्हणणाऱ्या शिवसेनेला सत्तेत आल्यावर मराठीचा विसर पडला का ? मतांसाठी सेनेची ही कसली लाचारी. राज्यात मराठी हे सक्तीचे असताना सेनेच्या नगरसेवकांकडूनच मुंबईत गुजराती भाषेचा प्रचार होत असेल तर महाराष्ट्राच दुर्भाग्य नाही का? असा सवाल मनसेचे उपविभागाध्यक्ष निलेश जंगम यांनी उपस्थित केला आहे.