भाजप हरला आणि कोरोना जिंकला, पश्चिम बंगालच्या निकालावरून शिवसेनेने भाजपला डिवचले

देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाला हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरवायला आले होते. पश्चिम बंगाल जिंकता यावे, यासाठी तिथे मतदानाच्या आठ फेऱ्या लावण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शाहांसह संपूर्ण केंद्र सरकार आणि भाजपला धूळ चारली, अशी टीका शिवसेनेनं केलीय. 

    भाजपवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निकालावरून भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. मोदी शाहांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही ममता बॅनर्जी यांचीच होती, असं शिवसेनेनं म्हटलंय. मोदी आणि भाजपाकडे निवडणुका जिंकण्याचं मंत्र आणि तंत्र असेल, मात्र ते अजिंक्य नाहीत, हे ममता बॅनर्जींनी सिद्ध केल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आलीय.

    देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाला हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरवायला आले होते. पश्चिम बंगाल जिंकता यावे, यासाठी तिथे मतदानाच्या आठ फेऱ्या लावण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शाहांसह संपूर्ण केंद्र सरकार आणि भाजपला धूळ चारली, अशी टीका शिवसेनेनं केलीय.

    पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींनी विजयाची हॅटट्रिक केली. २ मे नंतर ममता बॅनर्जी घरी जातील, अशा गर्जना केल्या गेल्या. ‘२ मई दिदी गई’ अशा घोषणा पंतप्रधान जाहीर सभांमधून देत होते. ममतांना घरी बसवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता आणि सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळवला, असं या अग्रलेखात म्हणण्यात आलंय.

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी मिळवलेला विजय ही मस्तवाल राजकारणाला मिळालेली चपराक आहे, अशी टीका शिवसेनेनं केलीय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे, तर कोरोना जिंकला, भाजप हरला असे करावे लागले, असं शिवसेनेनं म्हटलंय.