प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • चक्क १.५ लाखात खरेदी केला मृतदेह

मुंबई (Mumbai) : हरयाणातील एका व्यावसायिकाने १.६० कोटी रुपयांची विम्याची रक्कम हडपण्यासाठी आणि कर्जदारांच्या विळख्यातून सुटण्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बेबनाव रचला. आपले षडयंत्र यशस्वी व्हावे यासाठी या व्यावसायिकाने दीड लाखात कोरोना रुग्णाचा मृतदेह खरेदी केला होता अशीही चर्चा आहे; परंतु या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. खळबळजनक अशा ड्राम्याची सुरुवातच मंगळवार रात्रीपासून सुरू झली होती. हिसार जिल्ह्यातील हासी येथे जळित कारमध्ये राममेहर नामक एका व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला होता. राममेहरने अखेरच्या क्षणी नातेवाईकास कॉल करून जीव धोक्यात असल्याचे कळविले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी सर्वप्रथम पोलिसांना सूचना दिली व ते जेव्हा घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांना जळलेल्या कारमध्ये सांगाडाच आढळून आला होता.

६५ तासात नाट्यमय वळण
दुसऱ्या दिवशी राममेहरला ११ लाखांसाठी जिवंत जाळण्यात आल्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते; परंतु शुक्रवारपर्यंत मात्र या घटनेने नाट्यमय वळणही घेतले. या घटनेच्या ६५ तासानंतर राममेहर जिवंत असून त्यास १३०० कि.मी. दूर छत्तीसगडमधील बिलासपूर येथे पोलिसांनी पकडल्याचे व पोलिस पथकाने त्यास हांसी येथे आणल्याचेही वृत्त धडकले.

मैत्रिणीने केली पोलिसांची मदत
तसे पाहता स्वत:च्याच मृत्यूचे नाटक रचल्यानंतर प्रत्येक जण आश्चर्यचकित झाले होते. व्यावसायिकाच्या कॉल डिटेल्सची तपासणी केली असता पोलिसांना त्याच्या एका मैत्रिणीचा शोध लागला. तिच्या चौकशीनंतर या व्यावसायिकाचा शोध घेणे पोलिसांसाठी अडचणीचे ठरले नाही. डाटा गाव येथील रहिवासी डिस्पोजल फॅक्ट्रीचा संचालक राममेहरने काही काळापूर्वी १.६० कोटींचा विमा काढला होता असे निष्पन्न झाले.

राममेहरनेच रचले नाट्य
हिसार रेंजचे आयजी संजय कुमार यांनी विम्याची रक्कम हडपणे आणि कर्जदारांपासून सुटका करण्यासाठीच राममेरने स्वत:च्या मृत्यूचे नाटक रचल्याचा दावा केला. कारमध्ये ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता तो कोण होता याचा शोध घेतला जात असल्याचे ते म्हणाले. लुटमार आणि हत्येचा ड्रामा रचण्यासाठी राममेहरने दीड लाख रुपयात कोरोनाग्रस्ताचा मृतदेह खरेदी केला होता असा संशय आहे. हा मृतदेह चालकाच्या शेजारील सीटवर ठेवला आणि केमिकल टाकून आग लावून दिली अशीही शंका पोलिसांना आहे.

सायबरने सेलने केली पोलिसांची मदत
सायबर सेलच्या मदतीने व्यापारी राममेहरच्या कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना त्याच्या एका मैत्रिणीचा नंबर निदर्शनास आला. घटनेपूर्वी राममेहरची सतत सहा दिवस तिच्यासोबत चर्चा झाली होती. त्यानंतर अचानक नव्या क्रमांकावर त्यांचे बोलणेही झाल्याचे निदर्शनास आले होते. या नव्या नंबरचा शोध घेतला असता पोलिसांना लोकेशनही सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेची कसून चौकशी करताच सत्य बाहेर आले.