गुंडांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार; हिंगणघाटमधील घटना

हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी बुधवारी ११ जुलै रोजी रात्री पोलिस हवालदार कमलाकर धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारानंतर ते वेळीच सावध होत हवालदाराने धडपड करीत निशाणा हुकविला आणि दुर्घटना थोडक्यात टळली.

    वर्धा (Wardha) : हिंगणघाट शहरात गोळीबाराच्या घटनांनी खळबळ माजली आहे. गुरुवारी रात्री गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट पोलिसांवरच गोळीबार होत असल्याच्या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी बुधवारी ११ जुलै रोजी रात्री पोलिस हवालदार कमलाकर धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता. गोळीबारानंतर ते वेळीच सावध होत हवालदाराने धडपड करीत निशाणा हुकविला आणि दुर्घटना थोडक्यात टळली होती. मात्र, त्याच गुंडानी गुरुवारी रात्री हिंगणघाट नजीकच्या येणोरा शिवारात पुन्हा एकदा पाठलाग करीत असलेल्या पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली.

    दरम्यान, पोलिसांवर गोळीबार करुन दोन्ही गुंड फरार होण्यात यशस्वी झाले होते, परंतु पोलिसांच्या पाठलागानंतर आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास यापैकी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला तर दुसऱ्या अल्पवयीन आरोपीस शहरातील रेल्वेलाइन परिसरातून ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही आरोपी मुळ बिहार राज्यातील रहिवासी आहेत. सुदैवाने या दोन्ही गोळीबाराचे घटनेत पोलिसांसह कुणीही जखमी झाले नाही.