बीकेसी सेंटरमध्ये डॉक्टरांची वानवा; आयसीयूमध्ये आवश्यक २२१ ऐवजी ८९ डॉक्टरांकडून उपचार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी बीकेसीमध्ये ९०० खाटांचे कोविड सेंटर गेल्यावर्षी उभारण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच या केंद्रांमध्ये सुविधांची वाणवा असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यातच आता या केंद्रामध्ये डॉक्टर्सच नसल्याचे उघडकीस आले आहे.

  मुंबई : मुंबईतील बीकेसी कोविड सेंटरमध्ये सोईसुविधांची वाणवा असल्याचे सतत समोर येत आहे. मात्र आता या सेंटरमध्ये डॉक्टरांचीच उणीव असल्याचे उघडकीस आले आहे.

  बीकेसी कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये २२१ डॉक्टरांची आवश्यक असताना अवघे ८९ डॉक्टरच उपलब्ध असून, यातील बहुतांश डॉक्टर हे डेंटिस्ट आहेत. त्याचप्रमाणे सेंटरमध्ये कार्डिओलॉजिस्ट आणि न्युरोलॉजिस्टही उपलब्ध नाहीत. परिणामी रुग्णांवर चांगले उपचार होत नसल्याचे तक्रार रुग्णाचे नातेवाईक करत आहेत.

  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी बीकेसीमध्ये ९०० खाटांचे कोविड सेंटर गेल्यावर्षी उभारण्यात आले. मात्र सुरुवातीपासूनच या केंद्रांमध्ये सुविधांची वाणवा असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात होत होत्या. त्यातच आता या केंद्रामध्ये डॉक्टर्सच नसल्याचे उघडकीस आले आहे.

  केवळ ८९ डॉक्टर उपलब्ध

  आयसीयूमध्ये प्रत्येक १० रुग्णामागे सहा रुग्ण अपेक्षित आहे. त्यानुसार बीकेसी कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये २२१ डॉक्टरांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात तेथे अवघे ८९ डॉक्टर्सच उपलब्ध आहेत. त्यामुळे एका डॉक्टरला साधारणपणे १० ते १५ रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची कार्यक्षमता राहत नसल्याने रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

  आयसीयूमधील डॉक्टरांबरोबरच सेंटरमध्ये एखाद्या रुग्णाला हृदयासंदर्भात किंवा अर्धांगवायूचा त्रास जाणवल्यास कार्डिओलॉजिस्ट किंवा न्युरोलॉजिस्ट उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र अपुर्‍या डॉक्टरांबरोबरच कार्डिओलॉजिस्ट आणि न्युरोलॉजिस्टच उपलब्ध नाहीत.

  बीकेसीमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांला लवकर उपचार न मिळणे, आयसीयूतील रुग्णांवर डेंटिस्टकडून उपचार, यामुळे रुग्ण बर्‍याचदा दगावतो असल्याचेही बोलले जात आहे. तर अति गंभीर रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवल्यास त्यांचा जीव वाचतो, अशा अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी तातडीने व्यवस्था सुधारण्यासंदर्भात सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांना विनंती केली आहे.

  बीकेसी कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय उपलब्ध करण्यात संबंधित कत्राटदाराला अपयश येत असताना याच कंत्राटदाराला गोरेगाव येथील १२०० खाटा असलेले नेस्को कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय पुरवण्याचे कंत्राट महापालिकेकडून देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या सेंटरमध्येही उपचाराविना रुग्णांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप अखिल चित्रे यांनी केला.

  बीकेसी कोविड सेंटरमध्ये असलेल्या सोयीसुविधांच्या उणीवा आणि डॉक्टरांच्या कमतरतेसंदर्भात आम्ही सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे आणि कंत्राटदाराची भेट घेतली. त्यांनी परिस्थितीमध्ये तथ्य असल्याचे मान्य केले आहे. ढेरे यांनी पुढील सात दिवसांमध्ये परिस्थिती सुधारण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

  अखिल चित्रे, उपाध्यक्ष, मनविसे