अल्पसंख्याक युवक, महिलांना मिळणार कौशल्य विकास प्रशिक्षण, पहिल्या टप्प्यात इतक्या जणांचा समावेश

यंदा पहिल्या टप्प्यात ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मुंबई  :  राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील युवक आणि महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना स्थानिक व्यावसायिक आणि औद्योगिक गरजांनुसार कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च होणार असून आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.

यंदा पहिल्या टप्प्यात ११ हजार ७६४ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

बँकींग, हेल्थ केअर, लॉजिस्टीक्स अशी विविध प्रशिक्षणे

मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, जैन आणि ज्यू समुदायातील १५ ते ४५ वयोगटातील युवक आणि महिलांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. बँकींग आणि टॅक्स असिस्टंट, हेल्थ केअर, बांधकाम, लॉजिस्टीक्स, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, ॲनिमेशन आणि मल्टीमेडीया (असिस्टंट कॅमेरामन), ऑटोमोबाईल, मोटार मेकॅनिक हेवी व्हेईकल, रोड रोलर ड्रायव्हर, जेसीबी ड्रायव्हर यांसह स्थानिक व्यवसाय, स्थानिक उद्योग यांच्या गरजांनुसार हे प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण साधारण ३०० ते ६०० तासांचे असेल.

प्रशिक्षण संपल्यानंतर उमेदवारांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी संबंधीत प्रशिक्षण संस्थेमार्फत कार्यवाही करण्यात येईल. तसेच उमेदवारांना सेक्टर स्किल कौन्सील यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.