स्काय फाऊंडेशन वाढवतेय पोलिसांचे मनोबल

कोरोनामुळे गेल्या पाचेक महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे तसेच त्यासाठीच्या आवश्यक त्या बंदोबस्तासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राज्यातील पोलिसांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळताना दिसत नाही.

मुंबई : कोरोनामुळे (corona) गेल्या पाचेक महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊन (lockdown) मुळे तसेच त्यासाठीच्या आवश्यक त्या बंदोबस्तासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राज्यातील पोलिसांना (police) कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळताना दिसत नाही. अशावेळी पोलिसांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत त्यांचे मनोबल वाढवत कल्याण-डोंबिवली येथील स्काय फाऊंडेशनच्या (sky foundation) वतीने ​वैयक्तिक स्वच्छता किट देत सुखसंवाद साधण्यात आला.

स्काय फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि युवा प्रोत्साहक बी. शामराव यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची आखणी करण्यात आली होती. संस्थेच्या वतीने डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलिस ठाणे (manpada police thane) आणि मुलुंड पूर्व येथील नवघर पोलिस ठाण्या (navghar police thane) मध्ये नुकतीच भेट देण्यात आली. संस्थेच्यावतीने पोलिस ठाण्यातील सर्वांना वैयक्तिक स्वच्छता किट प्रदान करत सुखसंवाद साधण्यात आला. या दोन्ही पोलिस ठाण्यातील सर्व पोलिसांनी देखील अशाप्रकारे नागरिकांनी पुढाकार घेत, या अत्यंत मानसिक ताणाच्या परिस्थितीमध्ये मानवतेच्या भावनेतून येऊन आपल्यासोबत आत्मीयतेने संवाद साधल्याबद्दल स्काय फाऊंडेशन​च्या बी शामराव, स्मिता मार्तल, सुनील कलियान, किरण मगर यांचे विशेष आभार मानण्यात आले.

या भेटीबद्दल माध्यमांसोबत बोलताना स्काय फाऊंडेशनच्या बी. शामराव यांनी सांगितले की, ‘एकिकडे लॉकडाऊनचा आणि कोरोना प्रसाराचा ताण असतानाच मधल्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सामाजिक माध्यमांतून मोठ्याप्रमाणात मुंबई पोलिसांवर अनावश्यक ताशेरे ओढण्यात आले होते. त्यातच कोरोनाकाळातील बंदोबस्तावेळी कित्येक पोलिस कोरोना पॉझिटिव्ह झाले. या सगळ्यांमुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे त्यांचे मनोबल नेहमीच दृढ राहणे हे समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे.

स्काय फाऊंडेशनने त्यामुळे एक छोटी​​शी सुरुवात म्हणून अशाप्रकारे पोलिसांना भेट देऊन त्यांना समाजाकडून आश्वासक दिलासा देत, आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी भावना व्यक्त केली. पोलिससुध्दा आपल्यासारखेच सर्वसामान्य माणसे आहेत, त्यांनासुध्दा त्यांची कुटूंबे आहेत, मुले-बाळे आहेत. अशावेळी कोणत्याही कारणामुळे ते खचू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी समाज म्हणून आपलीच जबाबदारी आहे. स्काय फाऊंडेशनने यासाठी एक छोटेसे पाऊल उचलले आहे. हळूहळू आम्ही अधिकाधिक पोलिस ठाण्यात जाऊन शहरातील पोलिसांना मानसिक आधार देण्याच्या प्रयत्न करणार आहोत.’​​