बाटलीबंद साप
बाटलीबंद साप

मुंबई (Mumbai): कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाला साप चावल्याची घटना मंगळवारी घडली. रात्री २ च्या सुमारास साप वॉर्डात शिरला. सुरक्षा रक्षकाने सापाला पकडले. मात्र बाटलीत भरताना सापाने सुरक्षा रक्षकाच्या हाताला दंश केला. सुरक्षा रक्षकावर तातडीने रुग्णालयात उपचार करण्यात आले.

येथील भाभा रुग्णालयात साप येणे नवीन घटना नाही. कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. मंगळवारी रात्री घोणस साप एका वॉर्डमध्ये दिसून आला. साप पाहून वॉर्डमधील परिचारिका आणि कर्मचारी यांची धावपळ सुरु झाली. वॉर्डमध्ये साप शिरल्याचे कळताच ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक सुभाष पार्टे  यांनी धाव घेतली आणि सापाला पकडले. त्यानंतर सापाला बाटलीमध्ये भरत असताना त्याने सुरक्षारक्षकाच्या हाताला दंश केला. मात्र, तरीही सुरक्षा रक्षकाने त्याला बाटलीमध्ये भरून बाहेर सोडला.

सापाने दंश केल्याने सुरक्षा रक्षकाला तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर आता भाभा रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सुरक्षा रक्षकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी दिली.