तृतीय पंथीयांसाठी एसएनडीटीचा पुढाकार

मुंबई :कोरोनामुळे ग्रासलेल्या व्यक्तींना समाजातील दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. परंतु नेहमीच दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना ना सरकारी मदत मिळत आहे ना कोणत्या

 मुंबई :कोरोनामुळे ग्रासलेल्या व्यक्तींना समाजातील दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. परंतु नेहमीच दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना ना सरकारी मदत मिळत आहे ना कोणत्या संस्थांकडून. त्यामुळे एसएनडीटी विद्यापीठाने दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून कल्याणमधील १३० तृतीयपंथी व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. 

तृतीय पंथीय व्यक्तिंकडे रेशन कार्ड नाहीत त्यामुळे त्यांना सरकारी मदत मिळत नाहीत. त्यातच लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्याने पैसे ही नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खायला अन्न नाही आणि बाहेर पडल्यास कोरोनाची भीती यामुळे आपल्या वस्तीमध्येच राहणाऱ्या या तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रमुख प्रा. डाॅ. आशा पाटील धावून आल्या. त्यांनी तृतीयपंथीयांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी कल्याणमधील १३० तृतीयपंथीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करत ते त्यांच्यापर्यंत पोहचवले. जात पडताळणी दक्षता पथकाच्या पोलिस उपअधीक्षक सुनिता नाशिककर, प्रतिक्षा नगरमधील सलीम पटेल, कल्याणमधील नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने त्यांनी 130 तृतीय पंथीयांकरिता जीवनावश्यक वस्तूंची मदत उपलब्ध करून दिली. तसेच ह्या सर्व उपक्रमात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनीही सहकार्य केले. सध्याच्या परिस्थितीत समाजातील समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे असे एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग प्रमुख प्रा. डाॅ. आशा पाटील यांनी सांगितले.