…म्हणून महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे का?; प्रविण दरेकरांचा सरकारला सवाल

सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे का? मात्र त्यामुळे पोलिसांना काम करणे कठीण झाले असून, कायद्याचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला.

  मुंबई : सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा त्यांनी वाऱ्यावर सोडली आहे का? मात्र त्यामुळे पोलिसांना काम करणे कठीण झाले असून, कायद्याचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, असा घणाघात विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर केला.

  मुंबई भाजपा महिला मोर्चाची पवई पोलिस ठाण्यात धडक

  भाजपा महिला आघाडीच्या वतीने साकीनाका घटनेतील विकृत नराधमांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा मोर्चाच्या वतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर मोर्चा काढण्यात आला. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार मनीषाताई चौधरी, मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा-नगरसेविका शितल गंभीर, नगरसेवक जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, जतिन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

  राष्ट्रीय महिला आयोगाची घटनास्थळाला भेट

  यावेळी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली, त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली. राज्यातील महिलांप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे राज्य महिला आयोगावर नेमणुका सरकारने केल्या नाहीत. महिला आयोगावरील नेमणुकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते सही करत नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

  पोलीस आयुक्तांची हतबल मानसिकता

  मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बलात्काराच्या घटनेनंतर “आम्ही कुठेकुठे पोलीस ठेऊ ?”, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना दरेकर म्हणाले, मुंबई पोलीस दलाचे प्रमुखच जर अशा प्रकारे हतबलता दाखवत असतील तर पोलीस दलाने काय कारायचे ? पोलीस दलामध्ये ऊर्जा निर्माण करून महिला सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देण्याऐवजी पोलीस आयुक्त हतबलता व्यक्त करीत आहेत, हे अतिशय लाजिरवाणे आहे.

  दोन दिवसात महिला सुरक्षेचा कृती आराखडा मांडा

  सरकारच्या नाकर्तेपणामुळेच सरकारला शरम आणणारी घटना साकीनाक्यात घडली आहे. आतातरी सरकारने डोळे उघडून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, जोपर्यंत सरकार महिला सुरक्षेबाबतचा ॲक्शन प्लॅन महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार नाही तोपर्यंत भाजपा महिला आघाडी राज्यभर आंदोलन करील, असा इशाराही प्रविण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.