एव्हढा खर्च पेंग्विनना पोसण्यासाठी की पेंग्विन गॅंगला पोसण्यासाठी? मनसेचा सवाल

पेंग्विनच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच आता मनसेने मुंबईत पोस्टबाजी करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेनं मुंबईत काही ठिकाणी पोस्टर लावत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी”, असा खोचक सवाल करण्यात आला आहे.

    मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा पेंग्विनवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. यातच आता मनसेने मुंबईत पोस्टबाजी करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेनं मुंबईत काही ठिकाणी पोस्टर लावत शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. “एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी”, असा खोचक सवाल करण्यात आला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेला मात्र महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने सुद्धा यावर आक्षेप घेतला आहे.

    पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष व पेंग्विन खरेदीसाठी एकूण २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. पेंग्विन पक्षांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी राणीबागेत तज्ञ पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. तर पेंग्विन कक्षाच्या देखभालीसाठी महापालिकेचे अभियंता व कर्मचारी उपलब्ध आहेत. अशावेळी केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठीच या निविदा काढण्यात आल्या असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

    दरम्यान, पेंग्विन हे उद्यानाचे आकर्षण आहे. पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केल्यास त्यांच्या जिवाशी खेळण्यासारखे होईल. तेव्हा कोणतीही तडजोड होणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. परंतु प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

    तसेच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. हा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यातच आता मनसेनंही मुंबईतील वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटरवर हे पोस्टर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.