…म्हणून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय; सामनातून भाजपवर हल्लाबोल

  मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था कळपात वाघ शिरल्यामुळे भेदरलेल्या मेंढरांसारखी झालेय, असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आले आहे.

  दरम्यान दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लिहलेल्या अग्रलेखात भाजपवर चांगलेच आसूड ओढण्यात आले आहेत. भाजपच्या नेत्यांची सध्याची बेताल वक्तव्ये ऐकून लोकांची खूप करमणूक सुरु आहे. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरुच आहेत. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील, असा इशारा अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जोरदार राजकीय फटकेबाजी करणार, असा अंदाज बांधला जात आहे.

  …यासाठी दिल्लीश्वरांचा खटाटोप’

  दोन वर्षांपासून ठाकरे सरकार महाराष्ट्रात काम करत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरुन सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे. पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

  महाराष्ट्रावर लोड शेडिंग म्हणजे अंधाराचे संकट कोसळतान दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्याबाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतील उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली का? नागरिकांचा केंद्र सरकारवर विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे व्यापारी सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते, असे टीकास्त्र शिवसेनेकडून भाजपवर सोडण्यात आले आहे.

  … म्हणून आनंद साजरा करणारे मुंबईत मराठी कट्टे सजवतायत

  एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाबाबत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरु असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.