…तर एक डोस घेणाऱ्यांना मिळू शकते लोकलमध्ये ‘एन्ट्री’? रेल्वे प्रशासन घेणार मोठा निर्णय

लस प्रमाणपत्राची पडताळणी आणि लिंकच्या माध्यमातून ओळखपत्र घेतलेल्या प्रवाशांना लोकलचा पास देण्यात येत आहे. रविवार-सोमवार सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी लोकलला कमी प्रमाणात गर्दी दिसून आली. लशींचा पुरवठा कमी-अधिक होत असल्याने त्यानुसार लसीकरणाचा वेग कमी-अधिक होत आहे. दोन मात्राधारकांनाच लोकलमुभा दिल्याने एक मात्रा घेतलेला १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुण अद्याप प्रवासापासून वंचित आहेत. येत्या सात दिवसांत लोकल प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ दिसून आली नाही, तर एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांनादेखील लोकलमुभा देण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  मुंबई : प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींना मुंबईत रविवारपासून लोकलप्रवासाची मुभा मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकात नेमकी किती गर्दी होते, याचे नेमके चित्र काही दिवसांत स्पष्ट होईल. लसधारकांना लोकलमुभा दिल्यानंतरही गर्दी आटोक्यात राहिली, तर पुढील टप्प्यात लशीची एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांसाठीही लोकलची दारे उघडण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

  लस प्रमाणपत्राची पडताळणी आणि लिंकच्या माध्यमातून ओळखपत्र घेतलेल्या प्रवाशांना लोकलचा पास देण्यात येत आहे. रविवार-सोमवार सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी लोकलला कमी प्रमाणात गर्दी दिसून आली. लशींचा पुरवठा कमी-अधिक होत असल्याने त्यानुसार लसीकरणाचा वेग कमी-अधिक होत आहे. दोन मात्राधारकांनाच लोकलमुभा दिल्याने एक मात्रा घेतलेला १८ ते ४४ वर्षे वयोगटातील तरुण अद्याप प्रवासापासून वंचित आहेत. येत्या सात दिवसांत लोकल प्रवाशांच्या गर्दीत मोठी वाढ दिसून आली नाही, तर एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांनादेखील लोकलमुभा देण्याचा विचार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

  १२ लाख प्रवाशांची नोंद

  लोकलसेवा सर्वांसाठी खुली होण्याआधी, शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी प्रवासी संख्या १२ लाख ३९ हजार इतकी नोंदवण्यात आली. लसधारकांना लोकलमुभा मिळाल्यानंतर म्हणजेच, रविवारी प्रवासी संख्या आठ लाख ५० हजारापर्यंत खालावली. रविवार-सोमवार सुट्टी असल्याने किती अतिरिक्त प्रवाशांनी लोकलसेवेचा लाभ घेतला, हे नेमके स्पष्ट होत नाही. वाढीव प्रवासी संख्येचे नेमके चित्र स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

  बस थांब्यांवर गर्दी कायम

  राज्य सरकारने मुंबईची लोकल सेवा १५ ऑगस्टपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केली आहे. मात्र, तरीही लोकलपेक्षा बसलाच अधिक गर्दी होताना दिसत आहे. अनेक बस स्टॉपवर चाकरमान्यांची प्रचंड गर्दी कायम असल्याचे दिसते आहे. केवळ दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय पासची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे बस थांब्यांवर गर्दी होत आहे. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना लोकल प्रवास करता येत नाही. म्हणून सर्वसामान्य प्रवासी आजही बसने प्रवास करत आहेत. त्याचमुळे मुंबईमधील प्रत्येक बस थांब्यावर प्रवाशांची मोठी रांग दिसते.

  प्रवाशांचा आक्रोश

  शासकीय रुग्णालयामध्ये लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. परंतु, खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तीच लस मिळते. एकीकडे प्रवासासाठी लस घेण्याची सक्ती करणाऱ्या सरकारने लस उपलब्ध करून देण्याची मागणी जाेर धरत आहे.

  अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास

  अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील रेल्वे कर्मचारी विचारत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काेराेना प्रतिबंधक लसीच्या दाेन मात्रा घेतलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करुन रेल्वेचा पास देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. आतापर्यत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर दीड लाखापेक्षा पासची विक्री झाली. मात्र, याच बरोबर आता अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांना सुद्धा लसवंताप्रमाणचे काेराेना प्रतिबंधक लसीचे प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तिकीट आणि पास घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.

  रेल्वेच्या कारभारावर नाराजी

  अत्यावश्यक सेवेत काम करणारे राकेश जोगडे यांनी सांगितले की, जेव्हापासून लसवंतांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तिकीट खिडक्यांवर लसीच्या प्रमाणपत्राची विचारपूस केली जात आहे. त्यांना शासकीय ओळखपत्र दाखवून विश्वास बसत नाही. त्यामुळे आम्हाला तिकीट दिली जाते. त्यामुळे शासनाने तात्काळ यात लक्ष घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेचे तिकीट आणि पास तत्काळ मिळावेत, असे आदेश द्यावेत, अशी मागणी सुद्धा राकेश यांनी केली आहे.