पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित; नियम न पाळल्यास १० हजार रुपयाचा दंड

सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास २० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.

    मुंबई : मुंबईतील पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा सोसायट्यांनी कोरोनाचे नियम धाब्यावर धरल्यास १० हजार रुपये व दुस-यांदा नियम न पाळल्य़ास २० हजार रुपयाचा दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.

    कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून कडक निर्बंध जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. यात कोविड नियम मोडणा-या सोसायटींवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. एखाद्या सोसायटीत पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास अशी इमारत सील केली जाते. अशा सोसायट्या आता मायक्रो कंटेनमेंट घोषित करण्यात येणार आहेत. सोसायट्यांनी तसा गेटबाहेर फलक लावणे आवश्य़क आहे. या सोसायट्यांनी कोविड नियम पाऴणे बंधनकारक असून बाहेरील व्यक्तीस सोसायटीत प्रवेश देऊ नये. संबंधित गृहनिर्माण सोसायटीने या सर्वाचे निरीक्षण करून नियमाच्या अंमलबजावणीसाठी जबादारी घ्यावी असे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र सोसायटीने नियमाची अंमलबजावणी न केल्यास सोसायटीला १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. संबंधित सोसायटीने पुन्हा दुर्लक्ष करून नियम मोडल्यास २० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. पालिकेने तसे आदेश दिले असून त्याबाबत परिपत्रकही जारी केले आहे.

    • इमारतीबाहेर पोलिस तैनात करण्यात येतील
    • बाहेरील व्यक्तीला सोसायटीत प्रवेश बंदी
    • वर्तमान पत्र विक्रेत्यांनी सोसायटीच्या गेटवर वर्तमानपत्र द्यावे
    • जीवनावश्यक वस्तू, आदी साहित्यही सोसायटीच्या गेटवर स्वीकारावे सोसायटीतील व्यक्तीला कोरोना चाचणी करायची असल्यास त्यांनी लॅबच्या व्यक्तीला घरी बोलवावे
    • कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर पडल्यास एफआयआर दाखल होणार