
मुंबई : समुद्र पाहण्यासाठी पुण्यातील चार तरुणींनी पैंजण विकून मुंबई गाठली. मात्र, मुंबई पोलिसांनी वेळीच या मुलींना ताब्यात घेत पुणे येथील त्यांच्या घरी त्यांची पाठवणी केली.
वारजे भागातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या या १३ ते १६ वयोगटातील या चौघी मैत्रिणी आहेत. लॉकडाऊनमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या मैत्रिणी घरीच बसून होत्या. यादरम्यान त्यांनी भरपूर गप्पा मारल्या आणि मुंबईला समुद्र पाहण्यासाठी जाण्याचा प्लान बनवला.
मुंबईला जाण्यासाठी त्यांनी पैशांची जमवाजमव सुरु केली. तरी देखील जेवढी रक्कम पाहिजे तेवढी काही रक्कम जमा झाली नाही. त्यावर आता पैंजण विकून मुंबई गाठायची असा निश्चय चौघींनी केला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे लक्ष्मी रोडवरील सोन्या मारुती चौकातील एका दागिन्याच्या दुकानात त्यांनी पैंजण विकले.
स्वतः जवळ असलेली काही रक्कम अशी मिळून साधारण चार हजार रुपये होते. त्यानंतर रविवारी दुपारच्या सुमारास त्या चार मैत्रिणी घरातून बॅगा घेऊन स्वारगेट एसटी स्थानकात आल्या. तेथून पनवेल आणि नंतर दादर येथे पोहोचून मग रेल्वेने सीएसटीला पोहोचल्या.
फिरुन येतो असे म्हणत घराबाहेर पडलेल्या मुली घरी न आल्याने कुटुंबीयांची धावाधाव झाली. यामुळे चौघीच्या घरामधील मंडळी चिंतेत होते. अखेर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी मोबाइलचे लोकेशन तपासले असता त्या मुंबईला जात असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर मुंबई कंट्रोल रूममध्ये याबाबत सर्व माहिती दिली. संबधित अधिकार्यांना मुलींचे फोटो पाठवण्यात आले.
पोलिसांनी तपास सुरु केला आणि काही वेळात सीएसटी रेल्वे स्थानकात त्या मुली दिसताच त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यावर आम्ही मुंबईमधील समुद्रकिनारा पाहण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलींना कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं असल्याचं वारजे पोलिसांनी सांगितले.