सोनिया गांधींनी विचारले तरच उत्तर देणार; काँग्रेसच्या मंत्र्यांना थेट शरद पवारांचे प्रत्युत्तर

मल्टीस्टेट बॅंका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत, त्यामुळे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. गेली दहा वर्षे आपण कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता आणि आताही आहेत, असे पवार म्हणाले. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व डॉ. भागवत कराड या चौघांना स्थान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा मोदी सरकारने निर्माण केलेल्या सहकार खात्याची झाली. अमित शाह यांच्याकडे हे खाते गेल्याने त्यात आणखीच भर पडली होती. मात्र, पवार यांनी या चर्चेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.

  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेकदा वादग्रस्त विधाने केल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चर्चेत आले आहेत. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले हे ‘लहान नेते’ असल्याचा उल्लेख करीत हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा पटोले यांनी केली होती. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली होती. अजित पवार पुण्याचे की बारामतीचे पालकमंत्री आहेत, असा सवाल त्यांनी केला होता. तथापि पवार यांनी काँग्रेसमधील कोणतेही निर्णय हायकमांडच घेईल, असे संकेत देतानाच पटोलेंसारख्या नेत्यांचे महत्त्व नसल्याकडेही त्यांनी इंगित केले.

  अशा वादात मी पडत नाही, नानांसारखे लोकं लहान आहेत. त्यांच्याबाबत मी काय बोलणार असे सांगत सोनिया गांधींनी विचारले असते तर उत्तर दिले असते असे शरद पवार म्हणाले.

  मल्टीस्टेट बॅंका हा प्रकार केंद्राच्या अखत्यारीत, त्यामुळे सहकार मंत्रालय हा नवीन विषय नाही. गेली दहा वर्षे आपण कृषी खाते सांभाळत असतानाही हा विषय होता आणि आताही आहेत, असे पवार म्हणाले. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व डॉ. भागवत कराड या चौघांना स्थान देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील चार नेत्यांची जितकी चर्चा झाली, तितकीच चर्चा मोदी सरकारने निर्माण केलेल्या सहकार खात्याची झाली. अमित शाह यांच्याकडे हे खाते गेल्याने त्यात आणखीच भर पडली होती. मात्र, पवार यांनी या चर्चेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.

  विधानसभा अध्यक्षपदासाठी कांग्रेसला पाठिंबा

  यावेळी पवार यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावरही भाष्य केले. आमच्या तीन पक्षांचा स्वच्छेने निर्णय झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होते आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत, असेही ते म्हणाले. विधानसभेतील गदारोळावरही भाष्य करताना विधानसभेत गोंधळ झाला. शिक्षा झाली. त्यावर विधानसभेने निर्णयही घेतला आहे. आता ते काय जुनं उकरून काढायचं?, असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी चुकीचं काम केलं त्यांना शिक्षा करावी विधानसभेला वाटलं. त्यावर विधानसभेने निर्णयही घेतला आहे, असेही ते म्हणाले.

  सहकारमध्ये केंद्राला हस्तक्षेप करता येणार नाही

  राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्य सरकारचाच आहे. राज्याने केलेल्या सहकार कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येणार नाही. त्यामुळे नवे सहकार खाते निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर कोणतेही गंडांतर येणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारच्या नव्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. राज्य घटनेनुसार सहकार हा विषय राज्यांचा आहे. सहकार कायदे बनविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. त्यानुसार महाराष्ट्र विधानसभेने कायदेही केले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

  पवारांनी समान नागरी कायद्याबाबत कोर्टाने व्यक्त केलेल्या भूमिकेवरही भाष्य केले. समान नागरी कायद्याबाबत केंद्र सरकार जोपर्यंत काही भूमिका घेत नाही. तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, असे ते म्हणाले.