बीडमधील जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा; जयंत पाटलांचे निर्देश

बीड जिल्ह्यातील मर्यादित सिंचनाच्या सोयी पाहता जिल्ह्यातील जलसंपदा सक्षम करण्यासाठी विविध साठवण तलाव निर्माण करणे, मध्यम व लघु प्रकल्पांची उंची वाढवणे, विविध उपसा सिंचन योजना राबविणे, यांसह जिल्ह्यातील आमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत जलसंपदा विभागाशी संबंधित दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  मुंबई : बीड जिल्ह्यातील मर्यादित सिंचनाच्या सोयी पाहता जिल्ह्यातील जलसंपदा सक्षम करण्यासाठी विविध साठवण तलाव निर्माण करणे, मध्यम व लघु प्रकल्पांची उंची वाढवणे, विविध उपसा सिंचन योजना राबविणे, यांसह जिल्ह्यातील आमच्या सहकारी लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत जलसंपदा विभागाशी संबंधित दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बीड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.

  बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय…

  परळी तालुक्यातील वाण प्रकल्पातील गाळ काढून उंची वाढविण्यासंदर्भातील सर्वेक्षण मेरी (नाशिक) यांनी पूर्ण केले असून, तो अहवाल तातडीने प्राप्त करून त्यात सुचवल्याप्रमाणे गाळमुक्त धरण करून उंची वाढविण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश ना. जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  वाण व कुंडलिका धरणाच्या पाण्याचे वितरण बंदिस्त नाला वितरण प्रणाली द्वारे राबविण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

  माजलगाव उजव्या कालव्याच्या अस्तरीकरण कामाच्या सर्वेक्षणाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून अस्तरीकरणाच्या कामास तातडीने सुरुवात करण्याचे निर्देश यावेळी  जयंत पाटील यांनी विभागाला दिले. हे काम पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील शाश्वत सिंचनाचा मोठा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.

  आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावात उपसा सिंचन योजनेद्वारे भोसे खिंड बोगदा किंवा अन्य पर्याय वापरून अलाईनमेंट करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे, या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही यावेळी  पाटील यांनी म्हटले आहे.

  माजलगाव तालुक्यातील लोणी-सावंगी उपसा सिंचन योजनेच्या सद्यस्थितीचा यावेळी आढावा घेण्यात आला, भूसंपदानात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात असे निर्देश यावेळी ना. पाटील यांनी दिले, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भूसंपदनाबाबत जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी यावेळी घेतली आहे. तसेच या कामाला पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी राज्याच्या पुरवणी मागण्यांमधून उपलब्ध करून येत्या दोन वर्षांच्या आत ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात येईल, असेही ना. पाटील म्हणाले.

  वडवणी तालुक्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या साळिंबा उपसा सिंचन योजनेच्या पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करण्याचे निर्देश ना. जयंत पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. हे पाणी उपलब्ध झाल्याने वडवणी तालुक्यातील 5800 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

  बीड शहराचा पाणीपुरवठ्याच्या प्रश्न कायमचा मिटावा यासाठी बिंदुसरा नदीवर बीड शहर हद्दीत निम्नस्तर बंधारा बांधणे प्रस्तावित आहे, हे काम सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अडचणी व त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा, नगरविकास तसेच अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येईल असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  दरम्यान बीड जिल्ह्यातील अन्य धरणात गाळमुक्त धरण योजना राबवून त्यांची उंची वाढवणे यासह विविध लघु प्रकल्पांच्या निर्मितीसाठीच्या प्रस्तावांवर देखील या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील व जलसंपदा विभागाचे आभार मानले आहेत.