दोन डोस घेतलेल्यांना सवलत मिळण्याचे संकेत, १५ जुलैला मंत्रालयात खास बैठकीत होणार सोक्ष मोक्ष

दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे वगळता इतर ठिकाणी सवलत देण्याबाबतचा विचार मुंबई पालिका(BMC) प्रशासनाकडून केला जातो आहे. याबाबत येत्या १५ जुलै रोजी मंत्रालयात बैठक(Meeting In Mantralay) असून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    मुंबईः मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या(Corona Patient) घटली असली तरी संकट कायम असल्याने अजूनही लेव्हल तीनचे निर्बंध(Restriction) लागू आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना आस्थापना व इतर ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. मात्र ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना रेल्वे वगळता इतर ठिकाणी सवलत देण्याबाबतचा विचार मुंबई पालिका(BMC) प्रशासनाकडून केला जातो आहे. याबाबत येत्या १५ जुलै रोजी मंत्रालयात बैठक(Meeting In Mantralay) असून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

    राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरु करून टप्प्याटप्प्याने निर्णय शिथील केले जात आहे. कोरोना पॉझिव्हिटी रेटनुसार निर्बंध शिथील करण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्बंधाबाबत निर्णय घेतला जातो आहे. मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मुंबईचा पॉझिटिविटी दर सध्या दोन टक्के आहे. मात्र येणारे सणासुदीचे दिवस आणि तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे मुंबईचा समावेश लेव्हल तीनमध्ये करण्यात आला आहे. यानुसार मुंबईतील निर्बंध काहीअंशी शिथील करण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक वगळता आस्थापना व इतर ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

    कोरोना रोखण्यासाठी मुंबई पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत मुंबईत ५९ लाख २९ हजार नागरिकांनी लशीचे डोस घेतले आहेत. यात ४६ लाख ८१ हजार ७८० लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस १२ लाख ४७ हजार ४१० नागरिकांनी टोचून घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याबाबत पालिका प्रशासन विचार करीत आहे. येत्या १५ जुलै रोजी याबाबत चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली जाणार असून यात निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.